गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल, मोशी येथे विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहात
- देशप्रेम, शिस्त, कठोर परिश्रम आणि जबाबदार नागरिकत्वाचा विद्यार्थ्यांना संदेश

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल, मोशी येथे दि. २८ जुलै २०२६ रोजी विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, जबाबदारीची भावना आणि राष्ट्रप्रेम रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
हेही वाचा – डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास “क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया” कडून “ए” श्रेणीचे मानांकन
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यात तब्बल ३० वर्षे गौरवशाली सेवा बजावलेले सेवानिवृत्त सुबेदार मेजर के. बी. आढाव तसेच भारतीय हवाई दलात २० वर्षे उल्लेखनीय सेवा बजावलेले सेवानिवृत्त वॉरंट अधिकारी बाळू अबनवे उपस्थित होते.

यावेळी गायत्री ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष विनायकराव भोंगाळे, नगरसेविका व संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका कविताताई भोंगाळे-कडू पाटील, संस्थेचे सचिव संजय भोंगाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत तसेच विपणन अधिकारी शैलेंद्र सिंग यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाच्या उद्देशाची माहिती देण्यात आली. यावेळी नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी परिषदेची घोषणा करण्यात आली. विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडण्याची शपथ घेतली. तसेच नेतृत्व, शिस्त, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व जोपासण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशप्रेम, शिस्त, कठोर परिश्रम, नेतृत्वगुण आणि जबाबदार नागरिकत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. “देशसेवा ही केवळ सैन्यात भरती होऊनच करता येते असे नाही, तर प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करूनही देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देता येते,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थी परिषदेतून राष्ट्रभक्तीचा जागर..!
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. विद्यार्थी परिषदेच्या या शपथविधी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वक्षमता, कर्तव्यनिष्ठा, संघभावना आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.





