राज्यात वादळी पावसाचा प्रभाव वाढला; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज तर ‘या’ भागांना यलो अलर्ट!

पुणे | मागील काही दिवसांच्या तुलनेत राज्यात वादळी पावसाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असून आज काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ तर काही भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
वायव्य बंगालच्या उपसागरावर, तसेच उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. याशिवाय पश्चिम राजस्थानावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे देशातील पूर्व आणि उत्तर राज्यांसह महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार, तर विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. सोमवारपासून पुढील दोन दिवस राज्यात वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर अधिक राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा
भोसरी-दिघी परिसर ‘‘मेट्रो कनेक्टिव्हीटी’’ बाबत ‘‘नो कॉम्प्रमाईज’’
मागील चोवीस तासांत कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत वादळी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे व नाशिकच्या घाट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला, तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला असला तरी काही भागांत अजूनही पावसाची तूट कायम आहे.
आजचा हवामान अंदाज आणि अलर्ट
ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सातारा घाट विभाग आणि पुणे घाट विभाग या भागांमध्ये मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हलक्या सरींची शक्यता: नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे (मैदानी भाग), धाराशिव, बीड आणि परभणी या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.





