ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे २२ जुलै रोजी भव्य राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धा; ४२५ हून अधिक खेळाडूंचा सहभाग

​ अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजन; ६ लाख रुपयांची रोख पारितोषिके

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी भव्य राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे सलग १० वे वर्ष असून, सायकलींग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत देशभरातून ४२५ हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकलपटू सहभागी होणार आहेत.

विविध गट आणि ६ लाखांची बक्षीसे

​स्पर्धेतील सर्व वयोगटांतील विजेत्यांसाठी एकूण ६ लाख रुपयांची रोख बक्षीसे व स्मृतीचिन्ह प्रदान केले जाणार आहे. तसेच प्रसिद्ध दिवेघाट प्रथम पार करणाऱ्या सायकलपटूला ‘घाटाचा राजा’ हा मानाचा पुरस्कार दिला जाईल. या स्पर्धेत दिनेश कुमार, युवान शत्रू, गंगा दांडी, सविता हदगळ, श्रावणी परीट यांसारखे नामांकित खेळाडू आपले कौशल्य दाखवणार आहेत.

​स्पर्धेचे वर्गीकरण:

​१. पुणे ते बारामती (पुरुष – राष्ट्रीय स्तर): १२२ किलोमीटर

२. पुणे ते बारामती (पुरुष – राज्य स्तर): १२२ किलोमीटर

३. सासवड ते बारामती (पुरुष – MTB खुली स्पर्धा व सायकल रॅली): ८५ किलोमीटर

शनिवार वाड्यावर भव्य उद्घाटन व जनजागृती रॅली

​बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता शनिवार वाडा, पुणे येथून स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडेल. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुनील तटकरे, खासदार पार्थ पवार, आमदार दिलीप वळसे-पाटील, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

​आरोग्य, पर्यावरण आणि वाहतूक समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी शनिवार वाडा ते हडपसर या ‘नो व्हीकल झोन’ मार्गावर विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ३,००० ते ३,५०० विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी होऊन प्लास्टिक मुक्ती, स्वच्छता आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देतील.

हेही वाचा

निगडीत कचरा टाकण्यास नागरिकांचा तीव्र विरोध; कचरा गाड्या रोखल्या

मुख्य स्पर्धेला हडपसर येथून हिरवा झेंडा

​सकाळी ९:०० वाजता हडपसर गाडी सेंटर येथून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व इतर मान्यवरांच्या हस्ते मुख्य स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. ही स्पर्धा वडकी नाला, दिवेघाट, सासवड, जेजुरी, निरा, सोमेश्वर नगर मार्गे बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे समाप्त होईल.
​तसेच, सासवड येथे सकाळी १०:१५ वाजता दिगंबर दुर्गाडे, विजय शिवतारे व संजय जगदाळे यांच्या उपस्थितीत ८५ कि.मी. अंतराच्या एमटीबी (MTB) स्पर्धेचे उद्घाटन होईल.

दुपारी २ वाजता बारामतीत बक्षीस वितरण

​स्पर्धेचा सांगता व बक्षीस वितरण समारंभ दुपारी २:०० वाजता ग. दि. मा. सभागृह, बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि युवा नेते जय पवार यांच्या शुभहस्ते पार पडेल.

शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात ‘पुणे जिल्हा शिक्षण मंडळा’ची यशस्वी घोडदौड

कौलासवासी बाबुरावजी घोलप यांनी ७ सप्टेंबर १९४१ रोजी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखा’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन केलेल्या या संस्थेची सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने प्रगती सुरू आहे. आज संस्थेच्या १४५ हून अधिक शाखांमधून ९० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नुकत्याच झालेल्या शैक्षणिक वर्षात संस्थेचा १० वीचा निकाल ९६.६४% तर १२ वी विज्ञान शाखेचा निकाल ९७.५% लागला आहे.

मानांकन व पुरस्कार: रामकृष्ण मोरे महाविद्यालय (आकुर्डी) व अण्णासाहेब मगर महाविद्यालय (हडपसर) यांना ‘A+’ मानांकन मिळाले आहे, तर निगडी येथील आयुर्वेदिक रुग्णालयाला राज्यात प्रथम आणि देशात सातवा क्रमांक मिळाला आहे.

क्रीडा आणि सांस्कृतिक यश: २०१२-१३ ते २०२५ दरम्यान संस्थेच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर १२५, राष्ट्रीय स्तरावर ४२९ आणि राज्यस्तरावर ७३२ अशी एकूण १,२८६ पदके पटकावली आहेत. योगासनात रुद्र काळंबे व श्रेयस तरटे, तर डोजबॉलमध्ये संतोष कोळी यांनी आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

​या सायकल स्पर्धेत व जनजागृती रॅलीमध्ये नागरिक आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम आणि खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group