Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आरे परिसरात समृद्ध, प्रेरणादायी जंगल निर्माण करणार’; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. याअंतर्गत आरे परिसरातील तब्बल ८० एकर रिक्त जागेत ५ लाख वृक्षलागवड करण्यात येणार आहे. आरेला कागदावर जंगल म्हणून ओळख मिळाली होती; आता ती केवळ नोंदीपुरती न ठेवता प्रत्यक्षात हिरवाईने बहरलेले, समृद्ध आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असे जंगल निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आरे कॅम्प परिसरात वृक्षारोपण पार पडले. यावेळी आमदार मुरजी पटेल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुसळे, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेच्या अनुषंगाने ॲड. शेलार यांनी आरे कॅम्प, मेट्रो कारशेड परिसरातील रिक्त जागा, मेट्रो भवनाच्या राखीव जागा, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ परिसर, कृषी उद्योग विकास महामंडळ, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८, फोर्स वन, महानंद डेअरी; तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी केली. या पाहणीनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या अहवालानुसार या विविध ठिकाणी मिळून सुमारे ८० एकर जागा वृक्षारोपणासाठी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा –  केंद्र सरकारची मोठी घोषणा, इराण अमेरिका युद्धात थेट निर्णय, परदेशी गुंतवणूकदारांना..

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ही मोहीम केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा व्यापक उपक्रम असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी नमूद केले. या मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीआयएस आधारित नियोजन, डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली आणि वृक्षसंवर्धनासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रत्येक वृक्षाची वाढ, त्याचे संवर्धन आणि टिकाव यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.

याशिवाय पारंपरिक वृक्षारोपण पद्धतीसोबतच घनदाट, स्वयंपोषक आणि जैवविविधतेने समृद्ध शहरी जंगले निर्माण करण्यासाठी मियावाकी पद्धतीचाही अवलंब करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समन्वय साधत मुंबई उपनगराला अधिक हिरवे, अधिक सुंदर आणि अधिक पर्यावरणपूरक बनविण्याचा संकल्प यामागे असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button