मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटला; २५ किमीपर्यंत रांगा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटला; २५ किमीपर्यंत रांगा

पुणे | मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ झालेल्या भीषण अपघातामुळे गेल्या १५ तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली होती.

अपघाताला १५ तास उलटूनही पलटी झालेला टँकर हटवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू असून, त्याचा मोठा फटका वाहनचालकांना बसत आहे. द्रुतगती महामार्गासोबतच जुना पुणे–मुंबई महामार्गही काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्याने सुमारे २५ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा     :              लक्ष्मी ऑरगॅनिकसारख्या प्रकल्पांना कोकणात विरोधच; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

बुधवारी (४ फेब्रुवारी) सकाळपासून या मार्गावर भीषण वाहतूक कोंडी कायम असून, गुगल मॅपवरही हा संपूर्ण मार्ग ‘ब्लॉक’ असल्याचे दाखवले जात आहे. बोरघाट टप्प्यात किलोमीटर ४१ (मुंबई लेन) येथे झालेल्या या अपघातामुळे मुंबई–पुणे तसेच पुणे–मुंबई या दोन्ही दिशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या परिस्थितीमुळे महामार्ग पोलिसांनी नागरिकांना मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ताम्हिणी घाटातील रस्ता पर्यायी मार्ग म्हणून वापरण्यात येत आहे. मात्र, पुढील काही तासांत परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईल की नाही, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही.

पर्यायी मार्ग:

१) चांदणी चौक – ताम्हिणी घाट – रायगड मार्गे मुंबई (पुणे-पिरंगुट-पौड-मुळशी-ताम्हिणी घाट- वरचीवाडी-साजे-नांदगाव-पाली-पेडली-दुरशेत-उंबारेनंतर पुढे पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग)
२) आळे फाटा – माळशेज घाट – ठाणे मार्गे मुंबई

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *