राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार! हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Maharashtra Weather | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी लवकरच पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडतील तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात म्हणजेच 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान परतीचा मान्सून राज्यात प्रवेश करेल. या काळात विशेषतः कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा
हा परतीचा पाऊस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. खरीप हंगामातील उशिराच्या पेरणीवर तसेच उभ्या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो. विशेषतः सोयाबीन, तूर, मका, भात आणि भाजीपाला पिकांना या पावसाचा चांगला आधार मिळेल. आता सर्वजण या पावसाच्या आगमनाची आणि त्याच्या प्रभावाची आतुरतेने वाट पाहत आहेत.





