धुळेतील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले बावनकुळे; ‘नुकसानग्रस्त एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही’
अजंग-कासविहीर परिसरातील कापूस, सोयाबीन, तूर, मका पिकांची पाहणी; ७० टक्के पंचनामे पूर्ण, उर्वरित कामाला गती देण्याचे निर्देश

धुळे : पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर झालेल्या परिणामाची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळे तालुक्यातील अजंग-कासविहीर परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. कापूस, सोयाबीन, तूर आणि मका पिकांच्या नुकसानीची माहिती घेत त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राघवेंद्र भदाणे, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी संदीप पाटील आदी उपस्थित होते.
बावनकुळे यांनी नुकसानग्रस्त शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली. कापसाची अपेक्षित वाढ न होणे, तसेच सोयाबीन, तूर आणि मका पिकांवर पावसाअभावी झालेला परिणाम याबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. संभाव्य उत्पादन घट आणि आगामी अडचणींचाही त्यांनी आढावा घेतला.
हेही वाचा – नागपूरच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक ‘मसकऱ्या गणपती’; भोसले घराण्याने शेकडो वर्षे जपला वारसा
‘पंचनामे अचूक आणि वेळेत पूर्ण करा’
नुकसानग्रस्त एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वस्तुनिष्ठ, अचूक आणि वेळेत पूर्ण करावेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच पीकविमा योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना अनेक भागांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि मका पिकांना फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या सुमारे ७० टक्के पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामेही कोणतीही त्रुटी न ठेवता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी, यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया अचूकपणे पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. नुकसानाची वस्तुनिष्ठ नोंद झाल्यानंतर उपलब्ध शासकीय मदत आणि पीकविमा योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.





