दो बेचारे, बिना सहारे.. देखो, फूट फूट कर रोये !

काही वर्षांपूर्वी ‘व्हिक्टोरिया नंबर 203’ असा एक चित्रपट आला होता. अशोककुमार आणि प्राण अशा दिग्गज कलाकारांनी धमाल आणली होती. त्यांना एक किल्ली सापडते आणि त्या किल्लीचे कुलूप शोधत असतात. या चित्रपटाची आठवण आत्ताच होण्याचे कारण म्हणजे राहुल गांधी आणि शरद पवार ! कपोलकल्पित बाता मारून निवडणूक आयोगावर शंका घेत आहेत. पण, पुरावे देत नाहीत, ही शोकांतिका आहे.
पारदर्शकतेवरच अविश्वास !
निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच राहुल गांधी हे अविश्वास दाखवत असताना आयोगाने सांगितलेल्या किंवा मागितलेल्या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत. कोणताही पुरावा नाही, कसलीही कागदपत्रे हातात नाहीत आणि आरोप मात्र सुरू आहेत. हा आयोग विश्वासार्ह नाही, हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या हाकेला ‘ओ’ देत शरद पवार यांनी देखील एक पुडी सोडली आहे. निवडणुकीपूर्वी आपल्याला दोन माणसे भेटली होती आणि आपल्या पक्षाचा १६० जागांवर विजय निश्चित करून देतो, असे म्हणत त्यांनी संजय राऊत स्टाईल फेकाफेकी केली आहे.
शरद पवारांचे अर्धसत्य..
यामुळे दोन-तीन गोष्टींचा उलगडा होत नाही. ती माणसे कोण होती, त्यांना राहुल गांधी यांच्या घरी नेऊन सोडले तेथेही नोंद नव्हती का ? या प्रश्नांची शरद पवारांकडे उत्तरे नाहीत. एका कार्यक्रमात पन्नास वर्षांपूर्वी भेटलेल्या मित्राला हे ओळखतात, पण सात-आठ महिन्यापूर्वीची माणसे मात्र लक्षात राहत नाहीत, हा विनोद नाही का ? अर्थात, राहुल गांधी आणि शरद पवार या दोन बिचाऱ्यांची अवस्था, किल्ली आहे, पण कुलूप सापडत नाही अशी झाली असावी. त्यामुळेच खोटे बोल पण रेटून बोल, फेक नॅरेटिव्ह चा आधार घे, अशी झाली आहे.
पोलिसांकडे का नेले नाही?
संपूर्ण देशामध्ये राजकारणात मुरलेले सर्वात बुजूर्ग नेते म्हणजे शरद पवार ! निवडणुका फिरवण्याच्या इराद्याने त्यांच्याकडे आलेल्या त्या खोटारड्या माणसांना त्यांनी थेट सुनावले का नाही, आणि पोलिसांकडे का सोपवले नाही हा पहिला प्रश्न. त्यांना राहुल गांधी यांच्याकडे नेऊन निवडणुका पदरात पाडून घेण्याची चाल तर त्यांना रचायची नव्हती ना, हा दुसरा मुद्दा आणि गेले सुमारे वर्षभर ते गप्प का बसले हा तिसरा मुद्दा ! मुख्य म्हणजे शरद पवारांचे शंभर उमेदवार सुद्धा उभे नव्हते, १६० कसे जिंकणार होते? खरेच खोटारडेपणाची हद्द झाली. शरद पवार आणि राहुल गांधी यांना मीडियात डिमांड आल्यामुळे उद्धव ठाकरे मागे कसे राहिले असे म्हणत संजय राऊत यांनी देखील यामध्ये नाक खुपसले आणि ही दोन माणसे आम्हाला पण भेटण्याचे सांगून टाकले. शरद पवारांचे तीन खोटे मुद्दे अर्थातच संजय राऊत यांनाही लागू होतात. सगळी लबाडाची चाल..एक जरी पुरावा दिला तरी संपूर्ण देश विश्वास ठेवेल आणि निवडणूक आयोग तोंडावर पडेल ! पण हवेत गोळीबार करण्यात एक्सपर्ट असणारी ही मंडळी आपली सुसाट सुटली आहेत !
नेमके काय म्हणाले शरद पवार?
विधानसभा निवडणुकीआधी मला दिल्लीत दोन माणसे भेटली होती. त्यांनी मला १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला होता. आता या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. शरद पवारांना भेटलेली ती माणसे उद्धव ठाकरेंनाही भेटली होती, त्यांनी आम्हाला ६० ते ६५ कठीण जागा जिंकून देण्याचा दावा केला होता, असा मोठा खुलासा संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांची फेकाफेकी ?
शरद पवार यांनी जो विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि १६० जागा मिळवून देतो, विशिष्ट रक्कम द्या अशी मागणी केली. यापैकी काही लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले होते. आम्ही त्यांना सांगितले की आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. देशातले वातावरण पाहता लोकसभा आम्ही १०० टक्के जिंकू आणि खरोखर महाराष्ट्रात आम्ही ते यश प्राप्त केले. त्यामुळे निवडणुकीत अशा प्रकारे घोटाळे करून आम्हाला जिंकायची गरज नाही, असे म्हणे संजय राऊत म्हणाले. दररोज, सकाळी वर्षानुवर्षे टीव्ही समोर येणाऱ्या संजय राऊत यांना संपूर्ण वर्षात हा मुद्दा मांडायला सुचले नव्हते का? शरद पवार बोलत आहेत ना, मग त्याला दुजोरा द्या, एवढेच यात तथ्य असावे असे वाटते, बाकी नेहमीप्रमाणे नुसती फेकाफेकी !
हेही वाचा : ‘विधानसभेआधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली’; शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
‘त्या’ लोकांचे म्हणणे काय ?
संजय राऊत पुढे काय सांगतात ते पाहू. म्हणे, विधानसभा निवडणुकीपूर्वी ते लोक परत आले. आम्ही त्यांना सांगितले की लोकसभेत आमचा विजय झाला आहे. विधानसभेत आम्ही नक्की जिंकू. ते लोक म्हणाले की तुमच्या ज्या ६० ते ६५ जागा कठीण वाटत आहेत, त्या सांगा. आम्ही तुम्हाला त्या ‘ईव्हीएम’ च्या माध्यमातून विजयी करून देऊ. आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला त्याची गरज वाटत नाही. पण त्यांनी इतकेही सांगितले की तुम्हाला जरी हे आवश्यक वाटत नाही, तरी समोर जे सरकारमध्ये आहे, त्यांनी अशा प्रकारची योजना ‘ईव्हीएम’ च्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केले आहे, त्यामुळे तुमचे अपयश आम्हाला दिसत आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर, निवडणूक आयोगावर आणि लोकशाहीवर होता. दुर्दैवाने जे शरद पवार म्हणत आहेत आणि उद्धव ठाकरेंना जी माणसे भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावे,असे संजय राऊत म्हणाले.
अपयश आले की आरोप..
महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांना आरोप आणि टीका टिप्पणी याशिवाय काहीही उद्योग नाही. त्यांना कोणतेही काम करायचे नाही किंवा जनतेमध्ये जायचे नाही. सत्ताधारी करत असलेल्या कामाचा कोळंबा करणे आणि टीका करून त्यांना बदनाम करणे, हा या तिघांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. सत्ताधाऱ्यांच्याकडून होत असलेली सकारात्मक कामे त्यांना दिसत नाहीत, त्याची दखल घेणे सोडा त्याला अडथळे कसे निर्माण होतील एवढाच यांना धंदा आहे आणि हे सर्व देशातील जनता पाहत आहे, त्यामुळे जनतेनेच त्यांना त्याची जागा दाखवली आहे.
‘इंडिया’ आघाडीची बोंब..
भाजपा प्रणित एनडीए आघाडीच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीची स्थापना झाली. अपेक्षेप्रमाणे सर्वत्र अपयश आले. पण, त्यानंतर आघाडीच्या बैठका घेणे, एखादा कार्यक्रम हाती घेऊन देश ढवळून काढणे किंवा जनतेपुढे सकारात्मक भूमिका घेऊन जाणे, हे या ‘इंडिया’ आघाडीला मान्य नसावे. एक संघ नसलेली ही आघाडी विस्कटल्याप्रमाणे कार्यक्रम राबवत आहे. याउलट एनडीए आघाडी एकसंधपणे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या पाठीमागे भक्कम उभी आहे, हेच चित्र देशात असून ते राहुल गांधी यांना मान्य नाही.
राहुल गांधी कसे जिंकणार ?
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी म्हणजे अभ्यासशून्य आणि कर्तृत्वशून्य नेतृत्व असल्याचे सर्व जग जाणून आहे. विजय मिळाला की ईव्हीएम छान, आणि पराभव झालाय की ईव्हीएम घाण असे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. कर्नाटक सह अन्य ठिकाणी यश मिळाले की तेथे त्यांचा ईव्हीएम वर कधीच अविश्वास नसतो. पण ज्या ठिकाणी धूळधाण उडाली, तेथील मात्र सेट केलेली असतात. अशा या नेतृत्वाला भारतीयांनी झिडकारले आहे आणि आपल्या भूमिकेत सुधारणा केल्याशिवाय ते अंधारातून उजेडात येणार नाहीत. बेछूट, बिनबुडाचे आणि बिनधास्त आरोप करून मीडिया पुढे चमकोगिरी करता येते, पण आरोपात तथ्य नसेल तर हीच जनता तोंडावर पाडते, हे एकदा दोनदा नव्हे, तर वारंवार होत आहे, हे यांच्या नेत्यांच्या लक्षात येत नसेल का?





