TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

तरुणांच्या आवाजाला संजय राऊतांचा पाठिंबा; ‘MPSC विद्यार्थ्यांनो, आत्मविश्वास कायम ठेवा, मागे हटू नका’

MPSCचे वरपासून खालपर्यंत शुद्धीकरण करा’, सरकार तरुणांचे ऐकणार नसेल तर कोणाचे ऐकणार? असा राऊतांचा सवाल

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिला. MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासह आयोगाच्या ‘शुद्धीकरणा’ची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवावे, असे आवाहन राऊत यांनी केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला असल्याचा दावा त्यांनी केला.

राऊत म्हणाले, “तरुणांनी बोलू नये, शिक्षित होऊ नये आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवू नये, असे सत्ताधाऱ्यांना वाटते. मात्र, हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणे ही या मातीची शिकवण आहे.” गेल्या काही दिवसांपासून MPSC विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी आमदार रोहित पवार यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे सांगितले.

‘तुमच्या आवाजाने सरकार घाबरले आहे’

“तुमच्या आवाजाने सरकार घाबरले आहे; मात्र त्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतले आहे. पुण्यातील आंदोलन हे महाराष्ट्राचे जंतर-मंतर आहे. जंतर-मंतरचा पॅटर्न असा आहे की मागणी मान्य करून घेतल्याशिवाय आंदोलन थांबत नाही,” असे राऊत म्हणाले.

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा संदर्भ देत राऊत यांनी आयोगाच्या कारभारावरही टीका केली. “शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान गेले, आता नंबर MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांचा आहे,” असे ते म्हणाले. सरकार तरुणांचे ऐकणार नसेल तर कोणाचे ऐकणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा –  विधान परिषद निवडणुकीला रंगत; उमेदवार जाहीर होताच मतदारसंघांतील राजकीय हालचालींना वेग

‘MPSCचे शुद्धीकरण करण्याची विद्यार्थ्यांची मागणी’

आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा संदर्भ देताना राऊत म्हणाले की, MPSCचे वरपासून खालपर्यंत शुद्धीकरण करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. सरकारने आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.

“सरकार मनाने पवित्र असते तर विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला नसता. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या असत्या. जे सरकार शुद्ध पद्धतीने निवडणुका घेऊ शकत नाही, ते परीक्षा काय घेणार?” असा सवाल राऊत यांनी केला.

दरम्यान, MPSC आंदोलनात परीक्षा पद्धती आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे गट असल्याचेही समोर आले आहे. पुण्यात आंदोलनाची तीन ठिकाणे झाली असून विविध मागण्यांवरून मतभेद असल्याचे वृत्त आहे.

‘तरुणच बदल घडवणार’

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत राऊत यांनी तरुणांच्या आंदोलनक्षमतेचे कौतुक केले. “देशात बदल घडवून आणण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा. त्यामुळे चुकीचा माणूस पदावर बसवला जाणार नाही,” असे ते म्हणाले.

देशातील तरुणांमध्ये बदलाची भावना निर्माण होत असल्याचे सांगताना राऊत यांनी सरकारवर टीका केली. तरुणांना अंधभक्त बनवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, त्याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले.

“हा महाराष्ट्र लढण्याचा आणि लढवय्यांचा आहे,” असे म्हणत संजय राऊत यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा कायम असल्याचे स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button