Uncategorized

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

भगवंताचा आनंद हा निरुपाधिक असतो.

प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे. तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्‍वचितच मिळते. ज्या आनंदातून दु:ख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दु:ख का होते ? वास्तविक, आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो. म्हणजे, मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दु:ख ! दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो, त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद, तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते. अर्थात् तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठीच वाढवितो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तुरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. स्वानंदस्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा.

हेही वाचा –  लाडक्या बहि‍णींना 12 वा हफ्ता कधी मिळणार; मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती

खरी आनंदी वृत्ती हीच दसरा-दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय. जो नि:स्वार्थबुद्धीने प्रेम करतो, त्याला आनंद खास मिळतो. घेणारा ‘ मी ’ जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावे, रामाला आठवावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे, “ रामा, माझे मन शुद्ध कर. देहबुद्धी येऊ देऊ नको. तुझे चरण, तुझे हास्य, मला सदा पाहू दे. तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव. ” रामाला प्रेमाने आळवून, राम परमानंदरूप आहे असे जाणून, त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदाने असावे.

बोधवचन:- मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button