राज ठाकरेंचा इशारा अन् मनसैनिकांनी टाकली धाड; पनवेलमधील लेडीज बारची तोडफोड

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी शेकापच्या वर्धापनदिन सोहळ्यात पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत डान्सबार असल्यावरून टीका केली होती.
त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल तालुक्यातील कोन जवळ असलेल्या नाईट रायडरया लेडीज सर्विस बारवर धडक दिली. मध्यरात्री बारा वाजता मनसैनिकांनी हा बार फोडला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या अगदी काही अंतरावर हा बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे या कारवाईमुळे उघडकीस आले.
मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या या कारवाईत बारमधील फर्निचरची तोडफोड केली. यामुळे रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अनधिकृत बार व्यवसायावर मनसेने थेट आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडले. असे असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी होऊ लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत, जिथे बार बंद असावेत अशी अपेक्षा, तिथे अनधिकृत डान्सबार कसे सुरू राहतात, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी मांडला होता.
हेही वाचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरात असतानाच घराला बॉम्बने उडवण्याची धमकी, मोठी खळबळ, एकाला अटक
आज सर्वाधिक डान्सबार रायगड जिल्ह्यात कसे?, रायगड जिल्हा ही शिवछत्रपतींची राजधानी आहे. कल्याणच्या सूभेदाराची सून खणानारळाने ओटी भरणाऱ्या आपल्या राजा शिवछत्रपतींची राजधानी इथे आहे तिथे डान्सबार सुरू आहे. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य संमेलन भरवतंय, हे नुसते गुजराती माणसाबद्दल प्रेम नाही. त्यातून मराठी माणूस आणि गुजराती माणसांमध्ये भांडण लावावी यासाठी केलेले हे उद्योग आहे. तुम्हाला हवे ते आम्ही करणार नाही परंतु ज्यावेळी समजेल तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळी अंगावर येऊ.
एकीकडे शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेणारे अमराठी बार मालक आणि दुसरीकडे त्याच जमिनीवर पिळवणूक करणारी व्यवस्था या कचाट्यात रायगडचा शेतकरी भरडला जात आहे. कान बंद ठेवू नका, डोळे बंद ठेवू नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे त्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. तुम्ही विकले जातायेत, पायाखालची जमीन निसटतेय. भाषा जातेय मग कालांतराने डोक्यावर पश्चातापाचा हात मारावा लागेल. तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजे. कुटुंब उभी राहिली पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनांमुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अनधिकृत बारांवर काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





