भारतीय वंशाचे उत्तम धिल्लन अमेरिकेत ड्रग्जविरोधी संस्थेच्या प्रमुखपदी

वॉशिंग्टन – अमेरिकेत अमली पदार्थांची तस्करी आणि ड्रग्जचा वापर रोखण्यासाठीच्या “ड्रग्ज एन्फोर्समेंट एजन्सी'(डीईए)च्या प्रभारी व्यवस्थापकपदी भारतीय वंशाचे उत्तम धिल्लन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 30 वर्षांच्या स्सेवेनंतर निवृत्त होत असलेल्या रॉबर्ट पॅट्टरसन यांच्या जागेवर धिल्लन यांची नियुक्ती झाली आहे.
धिल्लन हे आतापर्यंत व्हाईट हाऊसमध्ये डेप्युटी कौन्सिल आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे डेप्युटी असिस्टंट म्हणून कार्यरत होते.
अमेरिकेमध्ये ड्रग्जमुळे दर 9 मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. ड्रग्जचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यादृष्टीने “डीईए’वर मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी “डीईए’च्या व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थ नेतृत्वाच्या हाती सोपवणे आवश्यक होते. त्यासाठीच धिल्लन यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे ऍटर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी सांगितले.
धिल्लन यांनी कॅलिफोर्नियातील बर्क्लेमधून कायद्याची पदवी संपादन केली. त्यापूर्वी सॅन दिएगोमधून एम.ए. आणि सॅक्रामॅन्टो येथून बी.ए.ची पदवी मिळवली आहे. धिल्लन हे एक समर्पित प्रशासकीय अधिकारी आहेत. व्हाईट हाऊस, न्यायविभाग, गृहसुरक्षा विभाग, कॉंग्रेस आणि ड्रग्जविरोधातील प्रकरणांमध्ये प्रांतिय सरकारी वकिल म्हणून त्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे.
ड्रग्ज आणि हिंसात्मक गुन्हेगारी विरोधात दीर्घकाळ कायदेशीर मार्गाने काम केल्यावर 2006 मध्ये गृह सुरक्षा विभागाअंतर्गत येणाऱ्या ड्रग्ज विरोधी संस्थेच्या प्रथम संचालक म्हणून धिल्लन यांच्या नियुक्तीला सिनेटने मान्यता दिली होती. आपल्या करिअरच्या सुरुवातीला कॅलिफोर्नियामध्ये डिस्ट्रीक्ट असिस्टंट ऍटर्नी म्हणून 6 वर्षे काम केले होते.





