‘शिंदेंच्या शिवसेनेएवढी मंत्रिपदे आम्हाला द्या’; अजितदादांच्या राष्ट्रवादीची मागणी

मुंबई | विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. यातच महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रिमदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडूनही शिंदेंच्या बरोबरीने आम्हालाही मंत्रिपदे देण्याची मागणी केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, की ईव्हीएममध्ये गडबड करणं हे अशक्य आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः देखील सांगितलं होतं की ईव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही. आता मतदानात वाढ झाली याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की, ६ वाजेपर्यंत मोठी गर्दी असते. मग गेट बंद केलं जातं आणि राहिलेल्या लोकांचं मतदान घेतलं जातं. त्यानंतर मतपेट्या बंद केल्या जातात. या सर्व गोष्टींना वेळ लागतो. शेवटच्या तासांत मोठ्या प्रमाणात मतदान होतं.
हेही वाचा – पुणे येथे बाल आनंद मेळावा संपन्न
मंत्री पदाबाबत मला देखील अनेक लोक वेगवेगळी नावं पाठवतात. मात्र, हे सर्व अंदाज आहेत. शेवटी ज्या दिवशी शपथविधी असतो, त्याच्या आधी एक दिवस पक्षाकडून सांगितलं जातं असतं. किंवा मंत्रिमंडळाची सर्व यादी राज्यपालांकडे जाते, तेव्हा ती यादी खरी असते. मात्र, तोपर्यंत हे सर्व अंदाज असतात, असं छगन भुजबळ म्हणाले.
स्ट्राईक रेटनुसार आमच्यात दोन आणि तीन नंबरमध्ये थोडासा फरक आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आमचा देखील स्ट्राईक रेट चांगला आहे. मग तुम्ही आम्हाला (अजित पवारांच्या राष्ट्रवादीला) त्यांच्या (शिंदेंच्या शिवसेनेच्या) बरोबरीने मंत्रिपदे द्या, एवढी आमची मागणी आहे. यावर आता जे काय आहे ते सर्व नेते बसून निर्णय घेतील. कदाचित आम्हाला (शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) सारख्या जागा देतील किंवा एखादी जागा कमी जास्त होईल, असं छगन भुजबळ म्हणाले.




