To The Point : चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांना दुरावलेले समर्थक, प्रत्येकवेळी ‘मीच’ या भूमिकेचा फटका!
विधानसभेकरिता सलग चौथ्यांदा निवडणूक पराभावाचा सामना : निवडणुकीत विकासाचे मुद्दे उशीरा हाताळले, बाहुबलही कमी पडले

पिंपरी- चिंचवड । विशेष प्रतिनिधी
‘‘आक्रमक स्वभाव, कोणतीही निवडणूक आली की मलाच उमेदवारी, मग पक्ष कोणताही असो या भूमिकेमुळे दुरावलेले समर्थक आणि केवळ जगताप कुटुंबाचा विरोध…’’ अशा एकाच ‘कलाटे पॅटर्न’मुळे चिंचवड विधानसभा निवडणुकीत क्षमता असूनही राहुल कलाटे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
विधानसभा निवडणुकीच्या राजकारणामध्ये कलाटे यांना चौथ्यांदा अपयश आले आहे. 2014 पासून जगताप कटुंबियांशी लढण्याची हिंमत ठेवणारे राहुल कलाटे बदलत्या काळानुसार ‘पॉलिटकली अपडेट’ राहिले नाही. आपल्या सोबत असलेल्यांना गृहित धरणे आणि तिकीटासाठी अनावश्यक तडजोडी करण्याच्या भूमिकेचा फटका कलाटे यांना बसला, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहरात विधानसभेची चर्चा सुरू झाली. त्यावेळीपासूनच राहुल कलाटे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर पूर्णपणे विसंबून राहिले. महाविकास आघाडीच्या तिकीटासाठी किंबहुना ‘तुतारी’साठी डॉ. कोल्हे यांनी मित्रप्रेम जपले आणि सर्व ताकद लावली. तिकीट खूचन आणण्यात कलाटे यशस्वी झाले मात्र राजकीय गोळाबेरीज करण्यात कमी पडले.
चिंचवडमध्ये ३,४८,४५० पुरूष तर ३,१५,११५ महिला, ५७ इतर असे ६,६३,६२२ मतदार आहेत. यापैकी २,०३,७८१ पुरूष, १,८३,७२४ महिला, १५ इतर अशा ३,८७,५२० म्हणजेच ५८.३९ टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी शंकर जगताप यांना २,३१,६१७ मते मिळाली. त्यांनी १,०३,१९१ मतांनी राहुल कलाटे यांचा पराभव केला. तर, कलाटे यांना १,२९,०७७ मतांवर समाधान मानावे लागले.
1. शरद पवार यांचा प्रभाव दिसला नाही…
राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार ज्या मतदार संघात सभा घेतात. तिथे भाकरी फिरवण्याची ताकद ठेवतात, असे सूत्र सांगितले जाते. मात्र, विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा प्रभाव दिसला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होईल, असा राजकीय अंदाज फेल ठरला. मतदारांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी शरद पवार पक्षालाही नाकारले. कलाटे यांनी शरद पवार यांची ऐतिहासिक रॅली घेतली. त्यानंतर सभाही झाली. या सभेत ‘‘संधी द्या… संधीचे सोने करु..’’ असे आवाहनही केले. ही सभा वातावरण फिरवेल, असा दावा केला जात होता. मात्र, तसे झाले नाही.
2. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्व दिले नाही…
निवडणुकीच्या तोंडावर कलाटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी जुळवून घेण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही. सर्वच पक्षांमध्ये ‘हायप्रोफाईल कॉन्टॅक्ट’ असल्यामुळे राहुल कलाटे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना जास्तीचे महत्त्व दिले नाही. त्यामुळे वैयक्तिक यंत्रणेच्या आधारे कलाटेंना निवडणूक लढवावी लागली. याउलट, शंकर जगताप यांनी आपल्या सर्व स्पर्धकांसोबत ‘समझोता’ केला. तिकीटासाठी बंडखोरीच्या तयारी असलेल्या इच्छुकांना सोबत घेण्यात जगताप यशस्वी झाले.
3. विकासाचे व्हीजन प्रभावीपणे मांडता आले नाही…
चिंचवड मतदार संघातील नव्याने विकसित झालेला परिसर, गावठाण आणि बैठ्या घरांच्या पट्यात विकासाचे व्हीजन राहुल कलाटे यांच्याकडे होते. मात्र, त्याचा प्रभावीपणे वापर त्यांना करता आला नाही. निवडणुकीचे तिकीटाचा मुद्दा शेवटच्या दिवसापर्यंत प्रलंबित राहिला. त्यामुळे चर्चा राजकीय झाली, विकासाच्या मुद्यांवर झालीच नाही. त्यामुळे सोसायटीधारकांचा निर्णायक मतदान भाजपाच्या पारड्यात सहज पडले. ताथवडे, पुनावळे, काळाखडक आणि वाकड सारख्या पट्टयात मतदारांमध्ये रस्ते, पाणी आणि पायाभूत सोयी-सुविधांबाबत नाराजी होती. मात्र, त्याचा राजकीय फायदा कलाटे यांना घेता आला नाही.
4. वेळोवेळी पक्ष बदलल्यामुळे ‘इम्पॅक्ट’
राहुल कलाटे २०१४ पासून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. २०१४ मध्ये एकत्रित शिवसेना, २०१९ मध्ये काँग्रेस-एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या पाठींब्यावर अपक्ष, २०२३ मध्ये बंडखोरी करत अपक्ष आणि २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कलाटे रिंगणात उतरले. २०१९ मध्ये सोबत असलेल्या नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, विनोद नढे यांनी पत्रकार परिषदेत घेत उमेदवार बदलण्याची मागणी केली. कलाटे यांच्याशिवाय दुसरा कोणताही उमेदवार द्या, आम्ही प्रचार करू अशी भूमिका शरद पवार यांच्यापुढे मांडली. मात्र, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जोर लावत ‘तुतारी’ची उमेदवारी कलाटे यांनाच मिळवून दिली. पुन्हा कलाटे यांनाच उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेल्या आणि भाजपचे काम करणार नसल्याचा इशारा देणाऱ्या या माजी नगरसेवकांनी कलाटे यांना साथ न देता महायुतीत राहून भाजपचे काम केले.
5. माजी नगरसेवकांचे मन वळविण्यात अपयश!
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपचे काम करण्यास तयार नव्हते. त्यामुळे या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविण्याची मोठी संधी कलाटे यांनी गमावली. त्यामुळे अनेकांनी नाइलाजासत्व भाजपचे काम केले. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे मोरेश्वर भोंडवे यांनी मेळावा घेऊन भाजपचे शंकर जगताप यांना पाठिंबा दिला. जगताप हे पक्षातील, मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करत बेरजेचे राजकारण करत होते. तर, दुसरीकडे कलाटे यांनी कोणाचीही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी, मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
6. उमेदवारी जाहीर होण्यास झालेला विलंब!
भाजपने गृहकलह मिटवून आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी शंकर जगताप यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाल्यानंतरही महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाला सुटणार हे निश्चित झाले नव्हते. अर्ज दाखल करण्याच्या काही तासांपर्यंत उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम होता. अगदी शेवटच्या क्षणी कलाटे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. त्यामुळे एकही प्रचार दौरा मतदारसंघात पूर्ण करता आला नाही. त्याचाही फटका कलाटे यांना बसला. दुसरीकडे शंकर जगताप यांनी प्रत्येक गावात किमान तीन ते चार वेळा प्रचार दौरा केला. त्याचा फायदा जगताप यांना झाला.
7. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर विसंबून रहाणे ठरले घातक!
राहुल कलाटे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. कोल्हे यांच्यामुळेच कलाटे यांना उमेदवारी मिळाली. पण, त्यांच्यावर विसंबून राहिल्याचाही फटका कलाटे यांना बसला. विधानसभा निवडणुकीत डॉ.कोल्हे यांचा करिष्मा कमी झाल्याचे दिसून आले. तीनवेळा निवडणूक लढविल्यानंतरही कलाटे हे निष्ठावंत कार्यकर्ते तयार करू शकले नाहीत. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्रचारात अभाव होता. दुसरीकडे जगताप यांच्याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फौज होती.
8. शहराध्यक्षाचे पिंपरीतच ठाण!
राष्ट्रवादीचे बहुतांश माजी नगरसेवक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे पक्षात राहिलेल्या माजी नगरसेवकांना भेटून प्रचारात सक्रिय करण्याऐवजी आता मला पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माझे काम करावेच लागेल या भूमिकेचाही कलाटे यांना फटका बसला. पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे हे पिंपळेनिलख भागाचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी पिंपरीतील उमेदवारीसाठी झोकून देऊन प्रचार केला. पण, चिंचवडमध्ये पक्षाचे मोठे नेते आल्यावरच कामठे प्रचारात दिसत होते. कलाटे यांच्यासोबत सांगवीचे माजी नगरसेवक नवनाथ जगताप हे पहिल्यापासून सोबत होते. तर, भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांचे समर्थक असलेले भाजपचे माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांचा प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पक्ष प्रवेश घडवून आणला. परंतु, त्याचाही फायदा झाल्याचे दिसले नाही.
9. शिवसेना व काँग्रेस कार्यकर्ते प्रचारातून दूर!
शहरातील चिंचवड, पिंपरी, आणि भोसरी हे तीनही मतदारसंघ महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटल्याने आघाडीतील इतर प्रमुख पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज होते. आणि याच नाराजीमुळे त्यांनी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून दूर राहणे पसंत केले. त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे शंकर जगताप यांना झाला आहे.
10. लढवय्या कलाटेंसाठी आता पुढे काय?
राहुल कलाटे यांचा सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. ते २०१७ मध्ये शिवसेनेकडून महापालिकेवर निवडून आले होते. कलाटे यांची भूमिका सतत धरसोड राहिली आहे. आता महापालिका निवडणुकीवेळी कलाटे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच राहतात की दुसऱ्या पक्षात जातात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. २०२९ पर्यंत चिंचवड मतदार संघाचे चिंचवड आणि हिंजवडी-वाकड असे दोन मतदार संघ होतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत सभागृहात धडक द्यायची आणि २०२९ च्या तयारीला लागायचे, असे चाल राहुल कलाटे खेळतील, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.





