To The Point: उत्तर पुणे जिल्ह्यात डाव टाकला पण, वस्तादांचा भोसरीत राखीव ‘खेळाडू’?
मिशन विधानसभा : भोसरीत महाविकास आघाडीचे मनोबल खचले!

पिंपरी-चिंचवड | महाराष्ट्रात नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ज्यांच्या राजकीय डावांची धास्ती असते, असे धुरंधर नेते शरद पवार यांनी उत्तर पुणे जिल्ह्यातील मोजक्या मतदार संघात डाव टाकला. यामध्ये अजित पवार गटाचे आंबेगावमधील दिलीप वळसे-पाटील, खेडमध्ये दिलीप मोहिते-पाटील, जुन्नरमध्ये अतुल बेनके यांचा अक्षरश: ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले. त्यानंतर चिंचवड मतदार संघातही राहुल कलाटे यांना एक संधी द्या, संधीचे सोने करुन दाखवतो, अशा शब्दांत त्यांनी भावनिक साद घातली.
पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दौरा केला. यामध्ये भोसरीची सभेत विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्याबाबत ‘ब्र’ अक्षरही काढले नाही. त्यामुळे भोसरीतील खेळाडू राखीव ठेवला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
वास्तविक, शरद पवार ज्या मतदार संघात सभा घेतात. त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या उमेदवाराची अस्वस्थता वाढते. किंबहुना, भाकरी फिरवा… असे आवाहन केले, तर राजकीय निकाल बदलण्याची ताकद शरद पवार यांच्या सभेत दिसते. भोसरी येथील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासाठी सभा झाली. मात्र, या सभेत पवार यांनी विरोधी महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्यावर भाष्य करणे टाळले.
‘‘भोसरीत शरद पवार यांची सभा होवू नये. या करिता आडकाठी केली जात होती’’ अशी जाहीर तक्रार माजी आमदार विलास लांडे यांनी व्यासपीठावर शरद पवार यांच्यासमोर केली. त्यामुळे पवार या मुद्याला धरुन आमदार महेश लांडगे यांच्यावर ‘डाव’ टाकतील, अशी अटकळ घातली जात होती. मात्र, तसे झाले नाही. याउलट, या सभेत पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांना एकप्रकारे ‘मायलेज’ मिळाले. प्रचंड शक्तीप्रदर्शन करुनही गव्हाणे यांना सभेचा राजकीय ‘बेनिफिट’ कितपत होईल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – लातूर शहरात ‘डॉ. अर्चना पाटील चाकूरकर’ “जायंट किलर” ठरणार ?
महेश लांडगेंचे ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ कामी आले?
आमदार महेश लांडगे यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आणि अपक्ष जिंकली होती. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि जिंकली होती. आता २०२४ मध्ये महेश लांडगे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. २०१९ मध्ये ‘‘पैलवानाला चितपट करण्यासाठी वस्ताद मैदानात’’ अशी घोषणा करण्यात आली. मात्र, लांडगे विजयी झाले होते. गेल्या १० वर्षांच्या विधानसभा सभागृहातील कार्यकाळामध्ये महेश लांडगे यांनी ‘‘‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’’ अशी संकल्पना मांडली आणि त्यानुसार आपली कृतीसुद्धा ठेवली. म्हणजे… राजकीय कितीही मतभेद असले, तरी कुणावर थेट टिका किंवा व्यक्तिगत आरोप करायचा नाही. याचाच फायदा महेश लांडगे यांना २०२४ च्या निवडणुकीत होताना दिसतो आहे, असे राजकीय जाणकार सांगतात. कारण, २०१४ ते २०२४ राज्यातील सत्ताधारी पक्षात किंवा विरोधी पक्षात असतानाही महेश लांडगे यांनी पवार कुटुंबीय किंवा अन्य कोणत्याही राजकीय नेत्यावर उथळपणे टिका केली नाही. दुसरीकडे, केलेल्या विकासकामांचे इतके प्रचंड ब्रँडिंग केले की, अगदी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हडपसर येथील सभेत ‘‘शास्तीकर माफी’’ संदर्भातील निर्णयाची दखल आणि दाखला देण्यात आला. विकासाच्या मुद्यांवर महेश लांडगे यांना ‘शह’ देता येत नाही आणि लांडगे कुणावर टीका-टिपण्णी करुन रोष ओढावून घेत नाहीत, ही त्यांची कार्यपद्धती त्यांच्या कामी आली. चांगले काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याला शरद पवार मदतच करतात, ही पवारांची ख्याती भोसरीतील सभेत पुन्हा एकदा अधोरेखित झाली. किंबहुना, मान्यवर नेत्यांनी कागद देवूनसुद्धा पवार काहीही बोलले नाहीत. लांडे गव्हणे यांनी सोयीनुसार पक्ष बदल केला व विश्वासहर्ता गमावली, त्यामुळेच पवारांनी ही भूमिका घेतली. मात्र, ही बाब महेश लांडगे यांच्या पथ्थ्यावर पडली आहे.
भोसरीसह पिंपरी-चिंचवडकरांना सूचक संदेश…
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आतापर्यंत भोसरी मतदार संघामध्ये तीन सर्व्हे करण्यात आले. या सव्हेमध्ये महाविकास आघाडीची कामगिरी उत्साहवर्धक नाही. त्यामुळेच शरद पवार यांनी या सभेत विरोधी पक्षाच्या उमेदवारावर बोलणे टाळले. पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून शहराची औद्योगिक ओळख निर्माण होईपर्यंत कोणी-कोणी योगदान दिले. त्यांचा उल्लेख आवर्जुन केला. ज्या मैदानात बाजू कमकुवत आहे. त्या ठिकाणी शरद पवार एकतर सभा घेत नाहीत आणि घेतलीच तर विरोधी उमेदवारावर बोलत नाहीत. याबाबत माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे आणि स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या लढतीचा संदर्भ दिला जातो. प्रा. रामकृष्ण मोरे काँग्रेसचे उमेदवार होते आणि माजी आमदार ज्ञानेश्वर तथा माऊली लांडगेंनी बंडखोरी केली होती. शरद पवार आणि प्रा. रामकृष्ण मोरे यांचे राजकीय संबंध सर्वश्रृत होते. प्रा. मोरे यांच्या भोसरीतील प्रचार सभेत साहेबांनी एकच गुगली टाकली. प्रचाराच्या समारोपाची सभा होती प्रा. मोरे सरांची मात्र, साहेब सहज नव्हे, तर जाणीवपूर्वक बोलून गेले. ते म्हणाले, माऊली तसा चांगला कार्यकर्ता आहे. भोसरीकरांना काय जायचा तो संदेश गेला आणि प्रा. मोरे सरांचा टांगा निवडणुकित पलटी झाला. केवळ भोसरीच्या एका सभेने हा चमत्कार केला. आजच्या घडीला माजी आमदार विलास लांडे आणि शरद पवार यांचे संबंध सर्वश्रूत आहेत. त्यामुळे महेश लांडगे यांच्यावर अवाक्षर न काढणे… यामुळे भोसरीसह पिंपरी-चिंचवडकरांमध्ये सूचक संदेश गेला आहे.
कुठे आणि काय म्हणाले शरद पवार?
खेड : महाविकास आघाडीत सर्वांना सोबत घेवून जायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी बाबाजी काळे यांच्या नावाची सूचना केली आणि आम्ही मान्य केली. त्यामुळे दादागिरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी त्यांना निवडून द्या.
आंबेगाव : गद्दारी करणाऱ्यांना माफी नाही. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही शिकवण दिली आहे. जे लोक सर्वकाही देवूनसुद्धा सोडून गेले. त्यांना १०० टक्के पाडा.
जुन्नर : संकटाच्या काळात जे सोडून गेले. त्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नव्या दमाच्या लोकांना विधानसभा सभागृहात पाठवा.
चिंचवड : उद्योगनगरीचे गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी एक संधी द्या. संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. टेंडरमध्ये नव्हे, तर लोकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणारा उमेदवार निवडून द्या.





