‘बटेंगे तो कटेंगे’बाबत नितीन गडकरींकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, ‘मी स्वयंसेवक संघाच्या..’

Nitin Gadkari | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पुढं रेटला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत हिंदू समुदायाला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ है’ असा नारा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या या दोन्ही घोषणाची चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही घोषणांबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
नितीन गडकरी म्हणाले, की निवडणुकीच्या काळात प्रत्येकाची प्रचाराची एक पद्धत असते. त्यातून या घोषणा दिल्या जात असाव्यात. मी मात्र याकडे संघाच्या हिंदुत्वाच्या व्याख्येतून बघतो. ही व्याख्या सर्व भारतीयांना सामावून घेणारी आहे. भारतीयत्वाशी जोडणारी आहे. यात जात, धर्म, पंथ भेदाला स्थान नाही. अलीकडे आपल्याला शेजारी राष्ट्रांकडून धोका वाढला आहे. पाकिस्तानचे दहशतवादी भारतात येतात, हल्ले करतात. बांगलादेशचे घुसखोर येतात. या सर्वांपासून सावध राहण्यासाठी संपूर्ण भारतीयांनी एक होणे गरजेचे आहे. कदाचित त्यातून ही घोषणा जन्माला आली असावी. मीसुद्धा त्याकडे याच दृष्टिकोनातून बघतो.
हेही वाचा – दौंड विधानसभा मतदारसंघात १ हजार ३ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क
घोषणांच्या गरजेविषयी मी बोलणे योग्य नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि व्यक्तीही वेगवेगळे असतात. विकासाचे म्हणाल तर गेल्या दहा वर्षांत आमच्या सरकारने देश व राज्याचा भरपूर विकास केला आहे. आणि त्याच आधारावर यावेळची निवडणूक आम्ही जिंकू. हा एकच मुद्दा यश मिळवण्यासाठी पुरेसा आहे असे मला वाटते, असंही नितीन गडकरी म्हणाले.





