Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा

Ravichandran Ashwin : भारतीय क्रिकेट संघाने आता २०२७ च्या वन-डे वर्ल्ड कपवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. संघाच्या रचनेबाबत सातत्याने चर्चा सुरू असून अनेक माजी खेळाडू आपली मते मांडत आहेत. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय गोलंदाजी अपेक्षेनुसार प्रभाव पाडू शकली नाही. याच दरम्यान भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन यांनी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे समर्थन केले आहे. निवडकर्त्यांनी २०२७ च्या वन-डे वर्ल्ड कपसाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाचा नक्कीच विचार केला पाहिजे, असे अश्विन यांचे मत आहे.

भुवनेश्वर कुमारबाबत आर. अश्विन यांनी मांडले मत

आर. अश्विन यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले, “२०२७ च्या वन-डे वर्ल्ड कपसाठी भुवनेश्वर कुमारचा विचार केला पाहिजे. तो आधीपेक्षा अधिक फिट दिसत आहे. त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि तो पॉवरप्लेसोबतच डेथ ओव्हर्समध्येही उत्तम गोलंदाजी करतो. याशिवाय तो खालच्या क्रमांकावर उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे मला वाटते की त्याला आणखी एक संधी मिळायला हवी.”

हेही वाचा –  फक्त २ तासांचा हा व्यायाम मृत्यूचा धोका कमी करतो! हार्वर्डच्या संशोधकांनी सांगितलं दीर्घायुष्याचं रहस्य

आयपीएल २०२६ मध्ये भुवीने पुन्हा दाखवली आपली कमाल

भुवनेश्वर कुमारने आयपीएल २०२६ मध्ये ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ (RCB) कडून खेळताना शानदार गोलंदाजी केली. त्याने नवीन चेंडूने आपल्या स्विंगची जादू दाखवली आणि डेथ ओव्हर्समध्ये अचूक यॉर्कर्स टाकून फलंदाजांना सातत्याने अडचणीत आणले. संपूर्ण हंगामात त्याने १६ सामन्यांत २८ बळी (Wickets) आपल्या नावावर केले. तो पर्पल कॅपच्या शर्यतीतही शेवटपर्यंत टिकून होता आणि अवघ्या एका विकेटने हा सन्मान मिळवण्यापासून हुकला.

२०२२ पासून वन-डे संघातून बाहेर आहे भुवनेश्वर

भुवनेश्वर कुमारने आपला शेवटचा वन-डे सामना २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्याने आठ षटकांत ६७ धावा दिल्या होत्या. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्यापासून अंतर राखले. तरीही त्याने टी-२० संघात काही काळ आपले स्थान टिकवून ठेवले होते. टी-२० वर्ल्ड कप २०२२ नंतर त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवास मंदावला आणि न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका ठरली.

अनुभव पुन्हा मिळवून देणार का पुनरागमनाची संधी?

भुवनेश्वर कुमारने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याची फिटनेस आणि अनुभव लक्षात घेता, आर. अश्विन यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, भारतीय संघाने २०२७ च्या वन-डे वर्ल्ड कपच्या तयारीमध्ये या अनुभवी वेगवान गोलंदाजाच्या नावावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. आता निवडकर्ते त्यांच्या या सल्ल्याला किती महत्त्व देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button