इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, एका व्यवसायिकावर गुन्हा दाखल

पिंपरी | रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याने पुन्हा एकदा पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) आला आहे. मागील सलग तीन दिवसांपासून नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग येत आहे. दरम्यान, इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या जाधववाडीतील एका भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडून नदी प्रदूषण केल्याने जाधववाडीतील भंगार व्यावसायिक रेहान एंटरप्रायजेसचे मालक अब्दुलमलीक अब्दुलजब्बार खान याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खान याचे कुदळवाडी परिसरात भंगारचे गोदाम आहे. त्याच्या गोदामातून रसायनयुक्त हिरवे लाल रंगाचे सांडपाणी इंद्रायणी नदीत मिसळत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत महापालिकेकडून पाहणी करून खातरजमा करण्यात आली. भंगार गोदाम लाखबंद (सील) करण्यात आले.
हेही वाचा – ‘मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो, मला अनेक मुस्लीम मित्र, पण..’; पंतप्रधान मोदींचं विधान चर्चेत
नदी पात्रात राडारोडा टाकणारे, रसायन मिश्रित पाणी सोडणारे यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. नदी पात्रात पाणी सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू केली असल्याचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल यांनी सांगितले.





