पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून शरद पवारांची खोचक टीका!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी १९ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदीवर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत. ही चांगली बाब आहे, महाराष्ट्रातील लोकांसंबंधी त्यांची आस्था वाढत आहे, असे दिसते. माझी मागणी आहे की, गुजरातला ते गेल्यानंतर काहीतरी देण्याबाबतचे औदार्य दाखवतात, तसे त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर काहीतरी देण्याची घोषणा केली तर माझ्यासह राज्यालाही आनंद होईल.
हेही वाचा – ‘डेल ऑर्टो इंडिया’च्या कामगारांना १८ हजारांची पगारवाढ!
मविआच्या बैठकीबाबत माझ्या सहकाऱ्यांनी मला माहिती दिली. अतिशय चांगली चर्चा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्यासाठी जो आग्रह केला, तो अतिशय योग्य आहे. केवळ पक्ष एकत्र येऊन चालणार नाही, तर काहीतरी कार्यक्रम द्यावा लागेल. निवडणुकीत जागा जिंकणे हे महत्त्वाचे असले तरी जागा कशासाठी जिंकायच्या, कोणत्या कार्यक्रमावर त्या जिंकायच्या यावर चर्चा झाली नाही तर नंतर मतभेद होतात. मतभेद टाळायचे असतील तर या गोष्टीची चर्चा व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ही योग्य आहे, असे मला वाटते, असं शरद पवार म्हणाले.
नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले आहेत. यावर शरद पवार म्हणाले की, नितीश कुमार यांनी एनडीएत जायचा निर्णय घेतला. पण खरं सांगायचं तर इंडिया आघाडीची स्थापना करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता. पण त्यांनी अचानक टोकाचा निर्णय का घेतला, याबद्दल काही सांगू शकत नाही. पण जे घडलं, ते चांगलं नाही झालं. पण बिहारमधील जनतेला त्यांचा हा निर्णय रुचलेला नाही. याचे परिणाम बिहारच्या निवडणुकीत दिसतील.





