‘२४ तारखेपेक्षा एक दिवसही जास्त वाढवून देणार नाही’; मनोज जरांगे पाटील

मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी १५ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. आज जरांगे पाटील अहमदनगर दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात ते श्रीरामपूरमध्ये सभा घेणार आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी २४ तारखेपेक्षा एक दिवसही जास्त वाढवून देणार नाही असं म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्यं केलेली नाहीत. ज्यांनी केली त्यांना अडवायचं होतं. आम्ही त्यांना उत्तर दिलं. घरात कुणी काही बोललं तर दुसरा माणूस विचारतोच की असं का बोललास बाबा? तसंच आहे. तसंच आम्ही आता २४ डिसेंबर पेक्षा जास्त वेळ सरकारला देणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. माझ्या समाजाला मी विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. २४ तारखेनंतर काय करायचं तो निर्णय मी त्यांनाच विचारुन घेणार आहे.
हेही वाचा – ‘जवळच्या माणसानेच घात केला’; बच्चू कडूंचं पंकजा मुंडे यांच्याबद्दल सूचक विधान
मराठा समाज आणि माझ्यात अतूट नातं तयार झालं आहे. त्यामुळे मराठा समाज माझ्या पाठिशी आहे. मी सर्वाधिक आनंदी आहे कारण लोक आमच्या समाजाला नावं ठेवत होते. मात्र आता मराठा आरक्षणासाठी जेवढे लोक एकत्र आले त्यामुळे सगळ्यांची तोंडं बंद झाली, असंही मनजो जरांगे पाटील म्हणाले.





