कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांत ‘टीबी’ संसर्ग वाढला; मध्यप्रदेशात आढळले रुग्ण

भोपाळ – काेराेना विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये आता एक गंभीर दुष्परिणाम दिसू लागला आहे. मध्यप्रदेशात काेराेनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना ‘टीबी’ झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.भाेपाळच्या हमिदिया रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांपैकी दरराेज १० ते १२ जणांना ‘टीबी’ झाल्याचे निदान हाेत आहे. त्यात बहुतांश रुग्णांना यापूर्वी काेराेना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. याबाबत डाॅ. लाेकेंद्र दवे म्हणाले, ‘काेराेनाचा संसर्ग आणि त्यावरील उपचारांचा टीबीच्या संसर्गाशी काही संबंध आहे का, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान बुरशीजन्य आजार आणि ‘टीबी’चे रुग्ण वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु ‘टीबी’चे बहुतांश रुग्ण उपचाराने बरे हाेत आहेत’, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ‘काेविड-१९’ हा एक विषाणूमुळे हाेणारा आजार आहे, तर ‘टीबी’ हा जंतुसंसर्गामुळे हाेताे. या दाेन्ही आजारांमध्ये रुग्णांची फुप्फुसे आणि श्वसनयंत्रणेवर परिणाम हाेताे.





