‘ठाकरे सरकारच्या काळात कायद्याचे तीन-तेरा वाजले’, उमा खापरेंचे टीकास्त्र

मुंबई – मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर आता राज्यातील राजकारण तापले असून, भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणात आरोपींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. तसेच, ठाकरे सरकारच्या काळात कायद्याचे तीन-तेरा वाजले आहेत, अशी टीका भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे.
वनसंरक्षक रेड्डी यांनी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही. हा प्रकार दुर्देवी आहे. शिवकुमारला अटक करण्यात आली आहे. मात्र त्यासोबतच रेड्डी यांनाही निलंबित करण्यात यावे, अशी मागणी खापरे यांनी केली.
अतिशय दुर्दैवी घटना
28 वर्षाच्या RFO वन परीक्षक अधिकारी दीपाली चव्हाण भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली
DCF शिवकुमार शर्मा च्या विरोधात तक्रार करूनही वनरक्षक रेड्डी यांनी विशाखा अंतर्गत ICC का दाखल करून घेतली नाही या सरकारच्या काळात कायद्याचे तीन-तेरा वाजले आहे— Uma Khapre (@KhapreU) March 26, 2021
या राज्यात महिला सुरक्षित नसून, सतत काहीना काही घटना घडत आहेत. ठाकरे सरकार आल्यापासून रोज महिलांवर अत्याचार होत आहे, अशी टीका खापरे यांनी केली.दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी शिवकुमारला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणातील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.





