Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पुरवठा विभागावर राहणार सीसीटीव्ही वॉच – राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम

Share On

मुंबई | प्रतिनधी

अन्न व नागरी पुरवठा विभागात पारदर्शकता यावी यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच चांगल्या दर्जाचे तांदूळ पुरवठा विभागाला मिळावे, यासाठी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या धान्य खरेदी केंद्राबरोबरच धान्याचे मिलिंग होणाऱ्या मिलमध्येही सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज दिले.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत बळकटीकरण व पारदर्शकता आणण्यासंदर्भात आज राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी विभागाचे सचिव विलास पाटील, सहसचिव मनोकुमार सुर्यवंशी यांच्यासह माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील वितरण व्यवस्थेचा आढावा घेऊन डॉ. कदम म्हणाले की, विभागाने यापूर्वीच धान खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेले चांगल्या दर्जाचे धान्यच पुरवठा विभागामार्फत राज्यातील जनतेला वितरित व्हावे, यासाठी धानाचे मिलिंग होणाऱ्या भात गिरण्याच्या ठिकाणीही सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. तसेच बाजारातील निकृष्ट बदलून दिलेला तांदूळ शासनाला मिळू नये, यासाठी भातगिरण्याच्या आवश्यक त्या तपासण्या करण्याचे निर्देशही राज्यमंत्री डॉ. कदम यांनी या वेळी दिले.

अन्नधान्य वाहतुकीसाठी प्रगत अशा जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित ॲप्लिकेशन येत्या तीन महिन्यात तयार करावे. त्यामध्ये वाहन जेथून धान्य घेऊन निघाले तेथील फोटो व जेथे धान्य पोचवले त्या ठिकाणचे फोटो हे जिओ टॅगिंगद्वारे त्या ॲपवर अपलोड करावे. यामुळे वितरण व्यवस्थेत तील रेशनच्या गैरप्रकाराला आळा बसेल.  असेही डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.

डॉ. कदम म्हणाले की, पुरवठा विभागातील धान्य चोरीसंदर्भात अनेक तक्रारी, लक्षवेधी सूचना व तारांकित प्रश्न उपस्थित होत असतात. पुरवठा विभागातील धान्य चोरी करणाऱ्या लोकांची यादी तयार करून अशा लोकांवर कारवाई करावी. तसेच सध्या नवीन वाहतूकदार नेमण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रक्रियेत निकोप स्पर्धा होण्यासाठी अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. जेणेकरून अधिक स्पर्धा होऊन योग्य असे पुरवठादार विभागाला मिळतील. त्यातून तळागाळापर्यंत योग्यरितीने धान्य पुरवठा होईल.

पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांनी आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगढ या राज्यातील पुरवठा विभागात करण्यात आलेल्या सुधारणा, तेथे वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर यांचा अभ्यास करून विभागात करण्यात येणाऱ्या सुधारणांसंबंधीचे सादरीकरण यावेळी केले.

या राज्यमंत्री महोदयांचे खासगी सचिव संपत डावखर, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अवर सचिव ज्योत्स्ना माडेकर, औरंगाबादचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एन. भास्कर, वि.क. यादव आदी यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button