#CoronaVirus: महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा, पण मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही- राहुल गांधी

देशात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देशातील परिस्थिती आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांविषयी राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. त्याचबरोबर महाराष्ट्रात वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येविषयीही त्यांनी भाष्य केलं. विशेषतः मुंबईत करोनाच्या प्रसाराच्या कारणांचा उलगडा करतानाच त्यांनी राज्यातील सत्तेत असलो, तरी निर्णय घेऊ शकत नाही. मात्र केंद्र सरकारनं महाराष्ट्राला मदत करायला हवी,” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
देशातील करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटलं होतं की, २१ दिवसात आपण करोना व्हायरसचा पराभव करू. पण, आता ६० दिवस झाले आहेत आणि करोना व्हायरस देशात झपाट्यानं पसरत चालला आहे. अशा स्थितीत आता लॉकडाउन हटवण्यात येत आहे. लॉकडाउनचे चार टप्पे पूर्ण होत आहेत. पण, पंतप्रधानांना जे अपेक्षित होतं, ते परिणाम मिळालेले नाहीत. त्यामुळे आता पुढे सरकार काय करणार आहे. कारण लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरला आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.





