#waragainstcorona: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कंटेंटमेंट परिसरात टाळेबंदीचे निर्बंध कडक राबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ताळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले.
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच योग्य ते उपाय सुचवून त्यांची गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू दर कमी करणे आवश्यक आहे. या भागात गर्दी होऊ नये ,यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येऊ नयेत, असे निर्देश त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. कंटेंटमेंट भागात लॉक डाऊनचे धोरण पोलीस प्रशासनाने कडक अवलंबून कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. यापूर्वी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना वेळेत व चांगल्या दर्जाचे भोजन पुरवावे. शहरातील रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांना अन्नधान्य व अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे. प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले निर्बंध पाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.





