शाळकरी मुलाच्या आईला वर्षाला १५ हजार; जगनमोहन रेड्डींची घोषणा

अमरावती | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. अम्मा वोडी या योजनेंतर्गत ज्या महिलांची मुलं शाळेत शिकत आहेत, त्यांना वर्षाला १५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हे अर्थसहाय्य दरवर्षी जानेवारीत थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केलं जाईल. जोपर्यंत मुलं शाळेत आहेत, तोपर्यंत सरकारकडून ही मदत दिली जाणार आहे.
राज्य सरकारने गेल्या आठवड्यात निधी देण्यासाठी आदेशही जारी केला आहे. या आदेशानुसार, ४३ लाख माता किंवा पालकांना फायदा होणार आहे. ज्या मातांची अल्पवयीन मुलं (१ ते १२ वी) खाजगी, सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिकतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शाळेत मुलांची हजेरी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. शिवाय कुटुंबाकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. शाळा सोडलेल्या मुलांसाठी हा निधी दिला जाणार नाही. सरकारी कर्मचारी आणि करदात्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.





