गोताबाय राजपक्ष यांच्या भारतभेटीच्या विरोधात एमडीएमकेची निदर्शने

नवी दिल्ली : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय राजपक्ष यांच्या आगामी भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर एमडीएमकेचे नेते वायको आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी राजपक्ष यांच्या विरोधात गुरुवारी जंतरमंतर येथे निदर्शने केली.
श्रीलंकेतील २००९ सालच्या नागरी युद्धादरम्यान देशाचे संरक्षणमंत्री असलेल्या राजपक्ष यांच्याशी ‘घसट करत असल्याचा’ आरोप वायको यांनी केंद्र सरकारवर केला.
नरेंद्र मोदी यांचे सरकार श्रीलंका सरकारशी घसट करत आहे. हे दुसरेतिसरे काही नसून, तमिळ लोकांचा विश्वासघात आहे. श्रीलंकेतील तमिळ लोक भयभीत असून गंभीर दहशतीखाली आहेत, असे वायको यांनी म्हटल्याचे त्यांच्या पक्षातर्फे चेन्नईत जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले.
श्रीलंकेचे नौदल तमिळनाडूतील मच्छीमारांवर वारंवार हल्ले करत आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये ५८०हून अधिक तमिळ मच्छीमार मारले गेले असून त्यांच्या बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक मच्छीमारांना श्रीलंकेतील तुरुंगांमध्ये डांबण्यात आले, असा आरोप वायको यांनी केला.
केंद्र सरकारच्या निमंत्रणावरून भारतात येत असलेल्या राजपक्ष यांच्या भेटीच्या निषेधार्थ ही निदर्शने असल्याचे राज्यसभेचे सदस्य असलेले वायको म्हणाले. पोलिसांनी काही काळ ही निदर्शने थांबवल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.





