‘पीएमसी’ बॅंकेच्या खातेदारांना दिलासा, गरजेपुरती रक्कम काढता येणार

मुंबई | महाईन्यूज
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. वैद्यकीय किंवा शैक्षणिक खर्चाच्या कारणास्तव आता पीएमसी खातेधारकांना बँक अकाऊण्टमधून 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे.
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘पीएमसी बँक खातेदार आता मेडिकल/शिक्षण इमरजन्सीसाठी अधिक 50 हजार रुपये त्यांचा खात्यातून काढू शकणार’ असं सोमय्यांनी म्हटलं आहे.
वैद्यकीय, शिक्षण यासारख्या अत्यावश्यक गरजेसाठीच खातेदाराला ही रक्कम काढता येणार आहे. पीएमसी बँकेमधून रक्कम काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध रद्द करावेत या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या 4 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
पीएमसी बँक घोटाळा दिवसेंदिवस गंभीर रुप घेत आहे. निर्बंधांविरोधात काही खातेधारकांनी मंगळवारी आझाद मैदानावर आंदोलन केलं. आर्थिक ताण सहन न झाल्यामुळे गेल्या काही दिवसात पाच खातेधारकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पीएमसी बँकेबाबत कोणताही निर्णय लागत नसल्याने खातेधारक चिंतेत होते. ही परिस्थिती लक्षात घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत केली आहे.




