भाजपच्या विरोधात उद्या महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शास्ती कराचा प्रश्न पंधरा दिवसांत सोडविण्याचे दिलेले आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळले नाही. अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण झाले नाही. त्यामुळे भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने उद्या गुरूवारी (दि. 31) महापालिका मुख्यालयासमोर दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज बुधवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील अनधिकृत बांधकामे आणि शास्तीचा प्रश्न गेली कित्योक वर्ष प्रलंबित आहे. भाजपची सत्ता येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. शहरात मुख्यमंत्र्यांचा चार वेळा दौरा झाला आहे. मात्र, प्रत्येकवेळी त्यांनी हे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. 9 जानेवारीला चिंचवडमधील जाहीर कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू असे आश्वासन दिले होते. ही मुदत 24 तारखेला संपली. मात्र, प्रश्न सुटला नाही. त्यामुळे ही घोषणाही ‘गाजर’च निघाले. या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे साने म्हणाले.
मानव कांबळे म्हणाले, ”भाजपने शहरवासियांना आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही. आघाडी सरकार शास्तीकराचा प्रश्न सोडवित नसल्याचे सांगत लक्ष्मण जगताप यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपात जाऊन निवडून आले. आता गल्ली ते दिल्ली भाजपचीच सत्ता आहे. चार वर्ष झाले तरी अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न सोडविता आला नाही. 600 स्केवअर फुटापर्यंत मिळकतींचा शास्तीकर माफ केल्याचे सांगत नागरिकांना फसविले जात आहे. संपूर्ण शास्तीकर माफ करावा, अशी आमची मागणी आहे. विरोधात असतानाही भाजपची हीच मागणी होती, असेही ते म्हणाले.
मारुती भापकर म्हणाले, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदाधिका-यांनी रडीचा डाव खेळत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आदेश देऊन महापालिका मुख्यालयासमोरील “काऊंट-डाऊन’चा फलक 21 जानेवारीलाच काढून टाकला. त्याचा निषेध आम्ही 22 जानेवारीला आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्र्यानी दिलेल्या त्या 15 दिवसांची मुदत 24 जानेवारीला संपली असून सत्ताधा-यांना कुंभकर्ण अवस्थेतून जागे करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिक शंखनाद, घंटानाद आंदोलन करणार आहेत.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, स्वराज अभियानचे मानव कांबळे, भारिप बहुजन महासंघाचे गुलाब पानपाटील, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, शेकापचे हरिष मोरे, मारुती भापकर, शिवशाही व्यापारी सेनेचे युवराज दाखले, गणेश आहेर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, सुभाष साळुंके, प्रल्हाद कांबळे उपस्थित होते.




