‘फ्लिपकार्ट’च्या सचिन बन्सल यांची ‘ओला’मध्ये 150 कोटींची गुंतवणूक

फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल यांनी ऑनलाइन कॅब सर्विस कंपनी ओलामध्ये 150 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ओलाचे प्रत्येकी 21,250 रुपयांचे 70 हजारहून अधिक शेअर्स त्यांनी खरेदी केले आहेत. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC))मधील कागदपत्रांच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी सचिन बन्सल यांनी 70 अब्ज रुपयांमध्ये फ्लिपकार्टचे सगळे शेअर वॉलमार्ट कंपनीला विकले होते. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टचा करारा झाला तेव्हापासूनच सचिन बन्सल यांनी ओलामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला होता असं म्हटलं जातंय. सचिन बन्सल ओलामध्ये एकूण 650 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं जातंय. देशातून पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे विदेशी कंपन्याकडून अब्जावधीची गुंतवणूक घेऊन ओला कंपनीचा व्यापार सध्या वाढवला जातो आहे. चीनच्या टेन्सट होल्डिंग्स या कंपनीने 2017 अखेर ओलामध्ये 77 कोटी रुपये गुंतवले होते. फंडींगद्वारे 7 हजार कोटी रुपये जमा करण्याचं ओलाचं उद्दीष्ट असून यापैकी 650 कोटी रुपये सचिन बन्सलचे असणार आहेत अशी चर्चा आहे.





