दाऊद इब्राहिमशी संबंधित धोकादायक इमारतीवर BMC चा बुलडोझर! कडक पोलीस बंदोबस्तात ‘मुसाफिरखाना’ पाडण्यास सुरुवात

मुंबई | मुंबईतील भेंडी बाजार परिसरात महानगरपालिकेकडून (BMC) आज मोठी निष्कासन कारवाई हाती घेण्यात आली आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या आणि अत्यंत धोकादायक झालेल्या ‘हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना’ या इमारतीवर बीएमसीचा बुलडोझर चालवण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कडक पोलीस बंदोबस्तात ही जीर्ण इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात दाऊदचे जुने घर आणि कार्यालय असल्याने या परिसरातील इतर धोकादायक इमारतींवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, भेंडी बाजारातील पाकमोडिया इस्टेट येथे असलेली ‘हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना’ ही इमारत राहण्यासाठी अत्यंत जीर्ण आणि असुरक्षित झाली आहे. या इमारतीच्या भिंती आणि छत कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाल्याने पालिकेने तिला ‘C-1’ (अतिधोकादायक) श्रेणीत घोषित केले होते. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी पालिकेने यापूर्वीच रहिवाशांना इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली होती. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार आज इमारत पाडण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा
लोहकरवाडीतील गरजू कुटुंबांसाठी नगरसेविका अर्चना करांडे यांचा पुढाकार!
दाऊद इब्राहिमशी संबंधित इमारतीवर BMC ची बुलडोझर कारवाई!
#DawoodIbrahim #Underworld #BulldozerAction #Dawood #MumbaiNews #CrimeNews #BreakingNews #UnderworldDon #NewsUpdate #ViralNews https://t.co/RdjYCjfyHn
— Mahaenews । महाईन्यूज (@mahaenews_) November 19, 2026
दाऊदच्या वडिलांच्या घराशी असलेले कनेक्शन
या इमारतीचा संबंध कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचे वडील इब्राहिम कासकर यांच्या जुन्या घराशी असल्याने या कारवाईकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून भेंडी बाजार आणि पाकमोडिया स्ट्रीट परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
“दाऊदचे घर पाडा, पण मशिदीला धक्का लागू देऊ नका” स्थानिकांचा आक्रमक पवित्रा
या कारवाईदरम्यान तळमजल्यावरील एका मशिदीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक मशीद असून, स्थानिक नागरिक तिचा वापर नमाज पठणासाठी करत होते. कारवाईच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नागरिकांना इतरत्र जाण्याच्या सूचना दिल्या असून ही मशीदही पाडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. याविरोधात स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत, “दाऊदचे घर जरूर पाडा, मात्र मशिदीला धक्काही लागता कामा नये,” अशी ठाम मागणी केली आहे.




