पोलिसांकडून नव्याने जबाब देण्यासाठी दबाव…

- कठुआ प्रकरणातील तीन साक्षीदारांची न्यायालयात धाव
नवी दिल्ली – कठुआ येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील तीन साक्षीदारांवर नव्याने जबाब देण्यासाठी पोलिसांकडून दबाव येत असून त्यासाठी आपला छळ केला जात असल्याची तक्रार या साक्षीदारांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यांच्या या तक्रारीवर येत्या 16 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा, न्या ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठापुढे येत्या बुधवारी ही सुनावणी होईल. साहील शर्मा आणि अन्य दोन साक्षीदारांनी ही तक्रार केली आहे. या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीचे हे तिघेही कॉलेज मित्र आहेत.
त्यांनी म्हटले आहे की पोलिसांपुढे आणि न्यायाधिशांपुढे आपण हा जबाब दिला आहे. पोलिसांपुढे दिलेला जबाब आपण त्यांच्या दबावाखाली आणि त्यांच्या निर्देशानुसार दिला असे त्यांनी न्यायाधिशांपुढे दिलेल्या जबाबात म्हटले आहे.त्यामुळे हा जबाब बदलावा आणि नव्याने जबाब द्यावा असा दबाव पोलिसांकडून येत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. कठुआत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याच्या प्रकरणात सात जणांवर आरोप दाखल करण्यात आला आहे.




