भेसळयुक्त दारू प्यायल्याने मणिपूरमध्ये १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू! १८० हून अधिक जणांची प्रकृती गंभीर

मणिपूर | मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात संशयास्पद भेसळयुक्त (विषारी) दारू प्यायल्याने १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच तब्बल १८० हून अधिक जणांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. गेल्या ४८ तासांत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
१८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हे मृत्यू झाले आहेत. चंदेलच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ८ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली होती, मात्र नंतर हा आकडा १५ वर पोहोचला. काही पीडितांचा मृत्यू घरीच झाला, तर काहींचा रुग्णालयात नेत असताना किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्राथमिक तपासात मृतांनी प्यायलेली दारू काकचिंग जिल्ह्यातील सुग्नू येथून आणली असल्याचे समोर आले आहे. नोंदवलेल्या मृत्यूंपैकी पाच मृत्यू सुग्नू पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. पोलिसांनी नागरिकांना या घटनेबाबत कोणत्याही अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा
अजमेरा सोसायटी रोड, नेहरूनगरमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा!
प्रशासनाकडून महत्त्वाच्या आरोग्यविषयक सूचना जारी
या घटनेचे गांभीर्य ओळखून चंदेलच्या उपायुक्तांनी गुरुवारी तातडीने ‘हेल्थ ॲडव्हायझरी’ जारी केली असून, वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्ट्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पुढील आदेशापर्यंत बाधित भागातील किंवा कोणत्याही संशयास्पद स्रोतांकडून खरेदी केलेल्या मद्याचे सेवन करू नये; तसेच मद्यपान केल्यानंतर उलट्या, पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दिसणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास विलंब न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




