breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार डॉ. अमोल कोल्हे पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा नवा चेहरा!

आगामी महापालिका निवडणुकांची धुरा सोपवणार

राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेस पक्षाची रणनिती

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस) ची धुरा आता शिरुरचे खासदार डॉ. आमोल कोल्हे यांच्या खांद्यावर देण्यात येणार आहे. याबाबत राज्यातील सत्ताधारी शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपाविरोधात नुकतीच पत्रकार परिषद घेवून टीकेची झोड उडवली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात आजपर्यंत राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांनी लक्ष घातले नव्हते. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा ‘कारभार’ डॉ. कोल्हेंकडे सापवण्यात येणार आहे. त्यातच महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून डॉ. कोल्हे यांचे नाव पुढे करण्यात येणार आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे मात्तब्बर नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करीत डॉ. कोल्हे यांनी संसदेत बाजी मारली. सध्या सोशल मीडियावर कोल्हे-आढळराव पाटील समर्थकांमध्ये ‘वॉर’ सुरू आहे. त्यातच शिवसेनेचे भोसरीतील स्थानिक नेते सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांच्यासह कामगार नेते इरफान सय्यद यांचे आढळराव पाटलांना खुले समर्थन आहे. आढळराव पाटील कोल्हेंसोबत आता जुळवून घ्यावे लागणार आहे.

दुसरीकडे, पिंपरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. खासदार बारणे यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा पराभव करण्यासाठी ‘स्थानिक- बाहेरचा’ या मुद्दा चर्चेत ठेवला होता. मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी आणि चिंचवड विधानसभेचा समावेश आहे. त्यामुळे खासदार बारणे यांनाही डॉ. कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिका निवडणुकीत काम करावे लागणार आहे.

भोसरीतील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, पिंपरीतील दिग्गज नेते माजी महापौर आझमभाई पानसरे, विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, चिंचवडमधील ज्येष्ठ नगरसेवक भाउसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासह अनेक जुने आणि नवोदित नेत्यांना आता डॉ. कोल्हे यांचे नेतृत्त्व मान्य करावे लागणार आहे.

शिवसेना गटनेता राहुल कलाटेंना संधी होती पण…
चिंचवड विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीत (२०१९) राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्र पक्षांनी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. भाजपाचे मात्तब्बर स्थानिक नेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात कलाटे यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे एकअर्थी पिंपरी-चिंचवड महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून राहुल कलाटे यांना संधी होती. पण, डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे धुरा सोपवल्यामुळे कलाटे यांची संधी हुकली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button