breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘हॉटेल सुरू पण ग्राहक नाहीत’; पहिल्याच दिवशी दिसले ‘हे’ चित्र

राज्यात आजपासून हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र पहिल्या दिवशी ग्राहकांचा अगदीच अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला. हॉटेल सुरू पण ग्राहक नाहीत, असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं.

प्रदीर्घ काळानंतर हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये बसून खानपान करण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळीच हॉटेलचे दरवाजे उघडले खरे, मात्र ग्राहकच येत नसल्याचा अनुभव बहुतांश हॉटेल चालकांना येत आहे. अद्यापही ग्राहक पार्सल घेऊन जाण्यावरच भर देत असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने हॉटेल सुरू करण्याबाबत काही मार्गदर्शक तत्वेही घालून दिली आहेत. गेल्या काही काळापासून हॉटलमधून पार्सलसेवा सुरू झाली होती. त्यामुळे किचन सुरू होतेच. आज सकाळी नियमानुसार बैठक व्यवस्था करून हॉटेलचालकांनी तयारी केली. मात्र, अद्याप ग्राहक येण्यास तयार नसल्याचे आढळून आले.

गावाला गेलेले सर्वच कर्मचारी अद्याप परतलेले नाहीत. तरीही उपलब्ध यंत्रणेच्या आधारे हॉटेल व्यावसायिक काम करतायत.विशेष म्हणजे बार आणि नॉन व्हेजकडे ग्राहकांचा कल असला तरी व्हेज हॉटेलांना अद्याप ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात लोकांच्या सवयी बदलल्या आहेत. प्रतिकारशक्ती वाढते म्हणून नॉनव्हेजकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसून येते. पार्सल सेवा सुरू असल्याच्या काळातही हाच अनुभव येत होता. भाज्यांचे वाढलेले भाव, नोकरांना द्यावा लागणारा जास्तीचा पगार, करोनासंबंधी घ्यायच्या विविध दक्षता यामुळे हॉटेलचालकांचा खर्च वाढणार आहे. यामुळे लोकांना हॉटेलमध्ये खानपानासाठी पहिल्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. आता लगेच भाववाढ झालेली नसली तरी नजीकच्या भविष्यात ती केली जाण्याची शक्यता आहे. यासोबतच सध्याची मागणी विचारात घेता पौष्टीक, प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या भाज्यांच्या आणि खाद्यांच्या डीशही सुरू केल्या जाण्याची शक्यता आहे.

कोरोनासंबंधी आता दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. दररोज आकडे कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता दक्षता घेण्याचीही लोकांना सवय झाल्याने बाहेर जाण्यापेक्षा घरीच खाण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button