स्वयंघोषित भ्रष्टाचार निर्मूलन संस्थांना धर्मादाय आयुक्तांचा चाप!
भ्रष्टाचार निर्मूलन’ तसेच ‘मानवाधिकार’ नाव लावलेल्या संस्था बहुतेक स्वयंघोषित संस्थांच्या कारभारातूनच मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असून त्याला चाप लावण्याचा निर्णय राज्याच्या धर्मादाय आयुक्तालयाने घेतला आहे. यापुढे कोणत्याही संस्थेला आपल्या नावात भ्रष्टाचार निर्मूलन अथवा मानवाधिकार हे शब्द वापरता येणार नाहीत, तसेच अशा संस्था आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे आदेश धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी राज्यातील धर्मादाय आयुक्तालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना जारी केले आहेत.
या संस्थांच्या नावात भ्रष्टाचार निर्मूलन महासंघ, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन अथवा भ्रष्टाचारमुक्त भारत अशी अथवा तत्सम नावे असल्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याचे अधिकार या संस्थेस असावे असे चित्र निर्माण होते. याचाच फायदा घेत यातील अनेक संस्था फसवाफसवीचे उद्योग करत असतात. उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार भ्रष्टाचार निर्मूलन हा कुठल्याही संस्थेचा सामाजिक हेतू असू शकत नाही, हे लक्षात घेता तसेच याबाबत आलेल्या तक्रारींचा विचार करून संबंधित सर्व संस्थांनी आपल्या नावातील भ्रष्टाचार तसेच मानवाधिकार हे शब्द काढून टाकावेत, असे आदेश धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ४ जुलै रोजी जारी केले आहेत.