breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘स्मार्ट सिटी’ने शहराचा नव्हे, आमदारांचा विकास साधला?

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा सवाल, निधी असतानाही महापालिकेवर भार

पिंपरी |महाईन्यूज|

अनावश्यक विकास कामांवरील उधळपट्टीला लगाम लावू, अशा आणाभाका करीत विद्यमान आमदारांनी महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु, शासनाचा निधी मिळत असताना ‘स्मार्ट सिटी’च्या गोंडस नावाखाली महापालिकेच्या तिजोरीतून खर्चाचा रतीब सुरु आहे. स्मार्ट सिटीतील एकही प्रकल्प अद्याप सुरु झाला नाही. ‘स्मार्ट सिटी’ने शहराचा नव्हे तर आमदारांचा विकास साधला, असा खोचक सवाल चिंचवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केला.

काळेवाडी परिसरातील पदयात्रे दरम्यान राहुल कलाटे बोलत होते. राहुल कलाटे म्हणाले की, चिंचवड विधानसभा मतदार संघात विकासात कुठेही समतोलपणा दिसत नाही. झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना अत्यंत हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. अशा काही भागांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत होणे अपेक्षित होते.

परंतु, पूर्वीच्याच विकसित प्रभागांचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश करीत या योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात आला. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत ‘एरिया बेस डेव्हलमेंट’मध्ये पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागाचा समावेश करण्यात आला आहे. सुमारे 320 कोटींचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. या एकूण कामापैकी रस्ते विकासासाठी 255 कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मिळणार आहे. असे असतानाही पिंपळे गुरव भागातील रस्त्यांच्या कामाच्या नावाखाली महापालिकेच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर खर्चाचा रतीब सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपळे गुरवमधील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 21 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. वास्तविकतः स्मार्ट सिटी अंतर्गत यापूर्वी हाती घेतलेल्या रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. सेवा वाहिन्यांसाठी खोदाई आणि रस्त्यांची कामे सुरु असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. ही कामे मार्गी लावण्याऐवजी महापालिकेच्या खर्चातून निविदांचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे एकाच ठेकेदाराला रस्त्याची कामे दिली जात आहेत. एवढेच नव्हे तर त्यासाठी सल्लागारांवरही खर्चाची उधळपट्टी सुरु आहे.

सल्लागार देखील ठराविकच आहेत. स्मार्ट सिटी योजनेसाठी स्वतंत्र कार्यालय असताना नेते स्वतःच्या कार्यालयात ठेकेदारांशी ‘डील’ करतात. 1 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कामांच्या निविदा आजवर काढण्यात आल्या. परंतु, प्रत्यक्षात कोणतेही काम अद्याप सुरु झाले नाही. केवळ हितसंबंधातील ठेकेदार पोसण्याचे काम यातून दिसून येते. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात मागील पाच वर्षात एकही भरीव काम झालेले नाही. मात्र, आपण हे चित्र पुर्णतः बदलणार आहोत. त्यासाठी जनतेने आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन कलाटे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button