breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या लॉंगमार्चला सुरुवात

पुणे – देशात तरुणांच्या भविष्यावर जुगार खेळला जात आहे. व्यवस्था बदलण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी शनिवारी येथे केले. स्पर्धा परीक्षा उमेदवारांची आज सुरू झालेली लॉंगमार्च ही त्याची सुरुवात ठरो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.
सरकारी नोकर भरती भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समितीतर्फे पुणे ते मुंबई लॉंगमार्चला डेक्कन नदीपात्रातून शनिवारी सायंकाळी सुरुवात झाली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, सुभाष वारे, स्मिता पानसरे यांनी उमेदवारांच्या लॉंगमार्चला पाठिंबा दिला. लॉंगमार्चचे आयोजक योगेश जाधव, गिरीश फोंडे, अमोल हिप्परगे, पंकज चव्हाण, महेश बढेसह आदी उपस्थित होते.
सरकारी नोकरी भरतीमध्ये गैरव्यवहाराचे अनेक प्रकार उजेडात येत आहेत. यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधील गैरप्रकार टाळले जावेत. जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची घोषणा शासनाने केली आहे, त्याची अंमलबजावणी करावी. खासगी कंपनीला नोकर भरतीची कामे कंत्राटी पध्दतीने देवू नये. महापोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑफलाईन पध्दतीने एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात. राज्य सेवेतील व जिल्हा पातळीवरील नोकर भरती घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी करावी, मागील सात वर्षांत झालेल्या बोगस नियुक्‍त्यांची चौकशी करावी, खोटे खेळाडू, जात, अपंग व टाईपिंग प्रमाणपत्र देवून शासकीय सेवेत आलेल्यांना बडतर्फ करावे, गट “अ’ ते गट “ड’ वर्गातील सर्व परीक्षा राज्य सेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, राज्य शासनामधील 1 लाख 77 हजार रिक्त जागा तसेच पोलिसांच्या 50 हजार रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात आदी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. डेक्कन नदीपात्रातून सुरू झालेला हा मोर्चा तळेगाव दाभाडे, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे मार्गे मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहे. या लॉंगमार्चमध्ये लोणावळा, कल्याण, ठाणे येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होतील, असे यावेळी सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button