breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्त्रीयांवरच्या अन्याय, अत्याचारावर बोलताना पक्षाची बंधने नको : नगरसेविका सिमा सावळे

पिंपरी । प्रतिनिधी

 हाथरसची घटना ही माणुसिकला काळीमा फासणारी आहे. स्त्री जातीवर होणारे अत्याचार, त्यातून होणारी मुस्काटदाबी, श्रध्दांजली वाहायची म्हटले तरी पक्षाची बंधने नकोत. अशा विषयावर महिलांनी महिला म्हणून एकत्र आले पाहिजे. अन्याय, अत्याचाराच्या विरोधात मोकळेपणाने बोलले पाहिजे, असे स्पष्ट मत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि भाजपच्या जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी व्यक्त केले.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पीडित मुलीला श्रध्दांजली वाहून पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज तहकूब करण्यात आली. महापौर मोई ढोरे अध्यक्षस्थानी होत्या. हाथरस प्रकऱणावर नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पीडित मुलीला श्रध्दांजली वाहताना यावेळी सिमा सावळे यांनी अत्यंत त्वेषाने आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी हा विषय उपस्थित केला. त्यावर स्वतः भाईर यांच्यासह सुजाता पालांडे, मंगला कदम, आशा शेंडगे, संगीता ताम्हाणे, सचिन चिखले, एकनाथ पवार, झामाबाई बारणे, राहुल कलाटे, नामदेव ढाके आणि अखेरिस महापौर माई ढोरे यांनी मतप्रदर्शन केले.

सिमा सावळे म्हणाल्या, खैरलांजलीत महिलांवर झालेले अत्याचार प्रकरणातील सगळे आरोपी निर्दोष सुटले. कोपर्डी प्रकऱणातील आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकऱणात याच सभागृहातील सर्वांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या होत्या. न्याय मिळायला सहा वर्षे लागली. २०१२ मध्ये कासारवाडी येथील एका अल्पवयीन मुलिवर अत्याचार झाले आणि तिला मारून रेल्वे रुळावर टाकले होते. या प्रकऱणात त्यावेळी आंदोलन केले, पोलिसांना निवेदने दिली मात्र अद्याप तपास लागलेला नाही. निगडी मधील छोट्या मुलिवरचे अत्याचाराचे प्रकरण सर्वांना माहित आहे. हाथरस घ्या, खैरलांजी आणि आता हाथरस प्रकरणात जात म्हणून पाहू नका. हा स्त्री जातीवर होणारा अत्याचार आहे. अशा विषयावर आपण स्त्री म्हणून एकत्र आले पाहिजे.

या समाजात आपण ५० टक्के आरक्षणातून तमाम महिलांच्या प्रतिनिधी म्हणून निवडूण आलो आहोत. शहरातील महिला भगिनी आपल्याकडे एक आदर्श म्हणून पाहतात. हाथरस अत्याचारात गेलेली मनीषा कुठल्याही पक्षाची नाही. माता-भगिनी तिथे बळी पडल्या नाहीत, निर्भया बळी पडली नाही तर या सभागृहातील तुमच्या आमच्या सारखी प्रत्यक स्त्री यात बळी गेली आहे. आमच्या न्यायासाठी आम्हाला दारोदारी फिरावे लागत असेल, कुणाच्या दबावाला बळी पडावे लागत असेल तर असली बंधने पाळू नका, मी असली बंधने पाळत नाही. आपण सर्व महिला नगरसेवकांनी याबाबत आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असे सिमाताई सावळे म्हणाल्या.

आशा शेंडगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कासारवाडी येथील अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख केला. मंगला कदम यांनीही शहातील अशाच काही घटनांवर भाष्य केले. बहुतेक सर्वच नगरसेविकांनी शहरातील अन्याय, अत्याचाराच्या घटनांवर प्रकाश टाकला आणि पोलिस आयुक्तांबरोबर एक बैठक निमंत्रीत करण्याची मागनी केली. अखेरीस महापौर माई ढोरे यांनी लवकरच अशा प्रकारची बैठक निमंत्रीत करण्याचे आश्वासन दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button