breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सोलापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक

सोलापूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केल्यानंतर आज मराठा समाजातर्फे सोलापूर शहर व जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार सकाळपासूनच शहर व जिल्ह्यात आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले असून माढ्यात रस्त्यावर टायर जाळून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, सोलापूर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौकाचौकात पोलिसांचे पथक उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सोलापुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे. शिवाजी चौक ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानावर, डाक बंगला ते आमदार प्रणिती शिंदे यांचे निवासस्थान, डी मार्ट ते आमदार सुभाष देशमुख यांचे निवासस्थान, तसेच शेळगी उड्डाण पूल ते खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे निवासस्थान असे आंदोलन केले जाणार आहे.

काल मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पावित्रा घेत मुंबईत ठिय्या आंदोलन केले. मुंबईतील जवळपास 18 ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. तर आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसह अनेक भागात बंद पाळण्यात आला आहे. तसेच उद्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यात विविध क्षेत्रातील सर्व तज्ज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असून राज्यभरातील मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button