breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सीएसएमटी स्थानकाचं खासगीकरण, अदानी, टाटा समूहासह विदेशी कंपन्या इच्छुक

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासासाठी भारतीय रेल्वेकडून वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. पुनर्विकास करण्यासाठी अदानी समूह, टाटा प्रोजेक्टसह देश-विदेशातील कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे. पुनर्विकासानंतर रेल्वे स्थानक ६० वर्षांसाठी संबंधित कंपन्यांना देखभाल करण्यासाठी भाडेकरारावर देण्यात येणार आहे.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुमार यादव यांच्या अध्यक्षतेखाली सीएसएमटी पुनर्विकासासाठी लिलावपूर्व बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला देश-विदेशातील ४३ विकासकांची उपस्थिती होती. यात जीएमआर, एस्सेल समूह, लार्सन अँड टुर्बो यांचा समावेश होता. या बैठकीत विकासकांना आर्थिक आणि तांत्रिक पात्रतेच्या निकषाबाबत माहिती देण्यात आली, असे भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाकडून (आयआरएसडीसी) स्पष्ट करण्यात आले.

सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पासाठी एक हजार ६४२ कोटी रुपये, तर बांधकामासाठी एक हजार ४३३ कोटी खर्च अपेक्षित आहे. बांधकाम पूर्ण करण्यासाठी चार वर्षांची मुदत असणार आहे. सीएसएमटी, वाडी बंदर आणि भायखळा परिसरातील एकूण २५ लाख स्के. फूट जमीन उपलब्ध होणार आहे.

रोजच्या गरजा भागवण्यासाठी सर्व वस्तू रेल्वे स्थानकात उपलब्ध होतील आणि प्रवाशांचा अतिरिक्त प्रवासवेळ वाचेल, अशा पद्धतीने सीएसएमटीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यात मॉल, किरकोळ विक्री केंद्र, मल्टिप्लेक्स अशा सुविधा उपलब्ध होतील.

‘पुनर्विकास करणाऱ्या विकासकाला सीएसएमटी परिसरातील रेल्वे जमीन वाणिज्य वापरासाठी ६० वर्षांच्या आणि निवासी वापरासाठी ९९ वर्षांच्या भाडेपट्टीवर देण्यात येईल. याचबरोबर सवलतीच्या आधारांवर रेल्वे स्थानक ६० वर्षांसाठी देखभालीकरिता देण्यात येईल’, असे ‘आयआरएसडीसी’तील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button