breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

साहेब आणि दादांच्या कर्मभूमीनंच पार्थच्या ‘पराभवा’चा गुलाल उचलला

  • पंधरा वर्षात साहेब आणि दादांनी भरभरून दिलं
  • पिंपरी-चिंचवडकरांनी पवार घराण्याला नाकारलं

– अमोल शित्रे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे या सांस्कृतीक नगरीनंतर पिंपरी-चिंचवडला उद्योगनगरीचा किताब मिळवून दिला. अजितदादांनी या भागातील ओसाड जमिनीवर ‘Planned City’चे चित्र डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवडचे अस्तित्व साकारले. साहेब आणि दादांचा जन्म बारामतीतला असला तरी पिंपरी-चिंचवडकडे त्यांनी कर्मभूमी म्हणून पाहिले आहे. त्या कर्मभूमीत पवार कुटुंबातील सदस्याचा निर्दयी पराभव व्हावा, एवढी कूस ही उद्योगनगरी बदलेल, असा विचार देखील दादांच्या मनाला स्पर्श केला नसेल. आज त्याच उद्योगनगरीने दादांचा ‘जीव की प्राण’ असलेल्या पार्थचा पराभव घडवून मानावर जिव्हारी घाव घातला आहे.

  • एक सुशिक्षीत आणि हरहुन्नर नेतृत्व म्हणून पुढे येऊ पाहत असलेल्या पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला. त्यांनी विद्यमान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राजकीय युध्द लढण्याचे धाडस दाखवले. ज्या दिवशी पार्थ यानी बारणे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. त्याच दिवशी त्यांचा विजय झाला, असे मानावे लागेल. कारण, बारणे म्हणजे साधीसुधी व्यक्ती नव्हे. सलग पाचवेळा पिंपरी-चिंचवड महापालिकेत ते नगरसेवक राहिले आहेत. प्रथम काँग्रेस त्यानंतर शिवसेनेत त्यांनी राजकीय करिअर घडविले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून संसदेत गेले. अशा बलाढ्य व्यक्तीच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस दाखविणे सर्वसाधारण व्यक्तीचे काम नव्हते. ते धाडस अत्यंत नवख्या असलेल्या पार्थ पवारांनी दाखविले. आणि त्यांनी निवडणूकही मोठ्या कष्टाने लढली. गावोगावी, पाढ्या, वस्त्या, शहरी भागात त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. कार्यकर्त्यांची फळी बसवली. साहेब आणि दादांना मानणा-या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खंबीर साथ दिली. परंतु, ज्या पिंपरी-चिंचवडकडे साहेब आणि दादांनी कर्मभूमी म्हणून पाहिले. त्याच भूमीने पवार घराण्याचा घात केला. या कर्मभूमीने एवढ्या झपाट्याने आपली कूस कशी काय बदलली?, या विचाराने सर्वांनाच अचंबित केले आहे.

शेकापचे जयंतराव पाटील यांनी दादांना दिलेला शब्द पाळला. मोठी मेहनत घेऊन त्यांनी अपेक्षीत मते मिळवून दिली. मात्र, पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदार संघात जोरदार फटका बसला. चिंचवड विधानसभेत श्रीरंग बारणे यांना 1 लाख 76 हजार 475 मते मिळाली. तर, पार्थ पवार यांना अवघी 79 हजार 717 मते पडली. या मतदार संघातून बारणे यांना 96 हजार 758 मतांची आघाडी मिळाली. पिंपरी विधानसभेत बारणेंना 1 लाख 3 हजार 235 मते पडली. तर, पार्थ यांना अवघी 61 हजार 941 मते मिळाली. या विधानसभेत बारणे 41 हजार 294 मतांनी आघाडीवर होते. त्याचबरोबर मावळ विधानसभा मतदार संघातून बारणे यांनी 1 लाख 5 हजार 272 मते मिळविली. तर, पार्थ यांना अवघी 83 हजार 445 मते पडली. या मतदार संघात देखील बारणे 21 हजार 827 मताने आघाडीवर होते. उरण, कर्जत आणि पनवेल विधानसभेत जवळपास दोघांनाही समसमान मते मिळाली आहेत. परंतु, मावळ, पिंपरी आणि चिंचवड विधानसभेतील मतदारांनी पार्थ पवार यांचा पराभव केला.

पदाधिकारी, कार्यकर्ते कमी पडले

पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. विशेषतः शरद पवार आणि अजित पवार यांना माननारा मोठा वर्ग आहे. नगरपरिषद, महापालिका यांच्या माध्यमातून अजितदादांनी या भागाचे सुजलाम सुफलाम केले आहे. साहेबांनी केंद्रातून विशेष लक्ष दिले म्हणूनच आज विदेशातून, परप्रांतातून, राज्याच्या कानाकोप-यातून नोकरीसाठी कामगारांची याठिकाणी रीघ लागली आहे. हा विकास झाला नसता तर पिंपरी-चिंचवडचा बकालपणा पहायला मिळाला असता. जमिनीला भाव आला नसता. शेती करणारा सामान्य शेतकरी पाच वर्षात कोट्याधीश झाला नसता. या परिस्थितीची जाण असून देखील पिंपरी-चिंचवडने पवार घराण्याकडे पाठ फिरवली. स्थानिक कार्यकर्ते देखील पार्थ पवार यांचे काम करण्यात कमी पडले. याचा हिशोब चुकता करावा लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button