breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

साहेबांचा शब्द माझ्यासाठी अंतिम, कसलाही गृहकलह नाही – अजित पवारांचा खुलासा

मुंबई,| महाईन्यूज |

शिखर बँकेच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अस्वस्थ आणि उद्विग्न झाल्याने मी कोणालाही न सांगता विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. आमच्या घरामध्ये कोणताही गृहकलह नाही. शरद पवार आमच्या कुटुंबाचे कुटूंबप्रमूख आहेत. त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.

शुक्रवारी संध्याकाळी अचानकपणे कोणालाही न सांगता अजित पवार यांनी विधान भवनात जाऊन आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपला फोनही बंद केला होता. शनिवारी सकाळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राजीनामा का दिला, याचा खुलासा केला.

अजित पवार म्हणाले, शिखर बँकेमध्ये १०८८ कोटी रुपयांची अनियमतता असल्याचे सांगितले जात आहे. काही लोक २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे पसरवित आहेत. ज्या बँकेकडे साडेअकरा ते १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तिथे एवढा मोठा भ्रष्टाचार कसा होईल. जर एवढा भ्रष्टाचार झाला असता, तर ती बँक अस्तित्त्वात राहिली असती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केवळ संचालक मंडळात अजित पवार यांचे नाव आहे म्हणून हा खटला उभा करण्यात आला आहे, असाही आरोप त्यांनी केला.

मी ३० वर्षे राजकीय जीवनात आहे. सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालविण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत, असे सांगून अजित पवार म्हणाले, कोणतेही कारखाने अडचणीत येतात, त्यावेळी सरकार मदत करते, नाबार्ड मदत करते. आताच राज्यातील सरकारने चार साखर कारखान्यांना आर्थिक मदत केली आहे. अशा पद्धतीने मदत करण्याचा सरकारला अधिकार आहे. शिखर बँकेत संचालक मंडळाच्या बैठकीत केवळ शिफारस येते. आम्ही त्याला होकार किंवा नकार देत असतो. त्यानंतर पैसे थेट बँकेत जमा होत असतात. मग आर्थिक गैरव्यवहाराचा प्रश्न आला कुठून, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी लवकर का संपविली जात नाही, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांचा शिखर बँकेच्या प्रकरणाशी दुरान्वयाने संबंध नाही. ते कुठेही संचालक नव्हते. पण त्यांचे नाव आल्यामुळे मी अस्वस्थ झालो. आपल्यामुळे साहेबांना बदनामी सहन करावी लागते आहे. या विचाराने मी उद्विग्न झालो आणि कोणालाही न सांगता आमदारकीचा राजीनामा दिला, असे अजित पवार म्हणाले.

सदसदविवेकबुद्धीला स्मरून मी अचानक राजीनामा दिला. पण माझ्या या निर्णयामुळे हितचिंतकांना वेदना झाल्या असतील. तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button