सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी महागणार
महाईन्यूज | पुणे
शिक्षणाचा खर्च वाढत असतानाच अव्यावसायिक व व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्कात अनुक्रमे ३० आणि २० टक्के शुल्कवाढ करावी, या मागणीचा ठराव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसमोर मांडण्यात आलेला आहे. हा ठराव मान्य झाला, तर पुणे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचा बोजा नक्कीच सहन करावा लागणार आहे. विद्यापीठाची अधिसभा १४ डिसेंबर रोजी होणार आहे.
अधिसभेचे सदस्य प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी शुल्कवाढीचा ठराव अधिसभेसमोर ठेवलेला आहे. पुणे विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी अनुदानित कला व वाणिज्य शाखेसाठी दोन ते तीन हजार रुपये शुल्क आहे, तर विनाअनुदानितसाठी सुमारे सहा हजार रुपये शुल्क आहे. विज्ञान शाखेसाठी अनुदानित महाविद्यालयात तीन ते साडेतीन हजार रुपये, तर विनाअुनदानितसाठी आठ हजारांपर्यंत शुल्क आहे. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचे शुल्क किमान २५ हजार रुपये आहे. शिक्षणाचा खर्च वाढत असताना पालक मेटाकुटीला आलेले आहेत, त्यातच हा शुल्कवाढीचा विषय समोर आलेला आहे.