breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सामाजिक सुरक्षा पथकाकडून दोन महिन्यांत ३१ अवैध धंद्यांवर छापा; एक कोटींचा ऐवज जप्त

पिंपरी । प्रतिनिधी

अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. या पथकाने अवघ्या दोन महिन्यांत ३१ ठिकाणी अवैध धंद्यांवर छापा मारला. या कारवाईमध्ये तब्बल ९९ लाख १२ हजार ३५६ रुपयांचा ऐजव जप्त केला. या कारवाईमुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गैरप्रकारांचे पितळ उघडे पडले आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांची २ सप्टेंबर रोजी बदली झाली. त्यांच्या जागी आर्यन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवडचे तिसरे पोलीस आयुक्‍त म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी शहरात एकही अवैध धंदा चालू देणार नसल्याचे सांगितले. तसेच पोलीस निरीक्षकांच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करून ते बंद करा, असे सक्‍त आदेश दिले.

मात्र त्यांच्या या आदेशाकडे पोलीस निरीक्षकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. अवैध धंदे सुरूच असल्याचे पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांच्या निदशर्नास आले. त्यांनी या धंद्यांवर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्याकडे या पथकाची धुरा सोपविण्यात आली.

आयुक्‍तांची प्रतिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पथकाने २६ सप्टेंबरपासून आपल्या धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली. मटका, जुगार, अवैध दारूविक्री, फर्निस ऑइलमध्ये भेसळ अशा ठिकाणी या पथकाने कारवाईचा सपाटा लावला. सर्वांत प्रथम कारवाई एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यावर केली. या पथकाने केलेल्या कारवाईत सर्वाधिक पाच अवैध धंद्यावर वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली.

त्यानंतर पिंपरी, चिंचवड पोलीस ठाणे आणि म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत प्रत्येकी तीन कारवाया सामाजिक सुरक्षा पथकाकडून करण्यात आल्या. तर निगडी, एमआयडीसी भोसरी, चाकण, सांगवी, हिंजवडी पोलीस ठाणे आणि शिरगाव चौकीच्या हद्दीत प्रत्येकी दोन अवैध धंद्यांवर छापेमारी करण्यात आली. तर चिखली, दिघी, भोसरी, देहूरोड, एमआयडीसी तळेगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका अवैध धंद्यांवर सामाजिक सुरक्षा पथकाकडून कारवाई करण्यात आली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील कोणत्याही भागात अवैध धंदा सुरू असतील तर नागरिकांनी 9764197977 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर माहिती द्यावी. अशी माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुपित ठेवण्यात येईल.
– विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक – सामाजिक सुरक्षा विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button