breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

साध्या बससह ‘शिवनेरी’चाही ठावठिकाणा समजणार

एसटीकडून ऑगस्ट महिन्यात ‘व्हीटीएस’ची अंमलबजावणी

एसटी आगारात किंवा स्थानकात वाट पाहत तिष्ठत उभे राहिलेल्या प्रवाशांना आता आपल्या गाडीचा ठावठिकाणा बसल्या जागी समजणार आहे. सर्वच एसटी गाडय़ांमध्ये लवकरच व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा (व्हीटीएस)बसवण्यात येणार आहे. या सुविधेची सुरुवात शिवनेरी बस प्रवाशांसाठी ऑगस्ट महिन्यापासून केली जाणार आहे.

एसटी महामंडळ गेल्या दोन वर्षांपासून ‘व्हीटीएस’ यंत्रणेवर काम करत आहे. एसटी स्थानकात किंवा आगारात उशिरा येण्यामागे अनेक कारणे असतात. त्याचा परिणाम अन्य बस सेवांवर होतो. एसटीचे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांनाही बसची सद्य:स्थिती समजण्यास मदत मिळावी, हे व्हीटीएस अंमलबजावणीमागील उद्देश आहेत. एखाद्या नियोजित किंवा अधिकृत थांब्यावरही बस न थांबल्यास त्याची माहितीही यामुळे महामंडळाला समजेल व त्या बस चालक किंवा वाहकावर कारवाईही करता येणे शक्य होणार आहे.

महामंडळाने १८ हजार बसगाडय़ांपैकी प्रथम नाशिक विभागासह अन्य काही मार्गावरील  चार हजार बसगाडय़ांना व्हीटीएस यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर बसवली. प्रवाशांसाठी सुविधा अमलात आणण्याऐवजी सुरुवातीला महामंडळाकडून त्याचा आढावा घेण्यात येत होता. आता प्रत्यक्षात प्रवाशांसाठीदेखील ऑगस्ट महिन्यात सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुविधा कशी?

एसटीची सद्य:स्थिती प्रवाशांना समजण्यासाठी स्थानक किंवा आगारांत एलसीडी स्क्रीन बसवण्यात येतील. याशिवाय एसटीच्या मोबाइल तिकीट आरक्षण अ‍ॅपवरही त्याची माहिती देण्यात येईल. प्रथम नाशिक विभागातील साध्या बसगाडय़ांतील प्रवाशांसाठी व्हीटीएसची सुविधा देतानाच सर्व शिवनेरी बस प्रवाशांनाही सुविधा उपलब्ध होणार आहे. शिवेनरीतदेखील ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे.

होणार काय? : एसटीच्या बसगाडय़ांमध्ये व्हीटीएस यंत्रणा बसवली जाणार आहे. जीपीएस यंत्रणेद्वारे ती हाताळली जाणार आहे. ही यंत्रणा हाताळण्यासाठी एक स्वतंत्र कक्षही स्थापन केला जाईल.

व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा प्रवाशांसाठी ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होईल. या महिन्याच्या अखेर यातील काही तांत्रिक अडचणी दूर होतील. या यंत्रणेमुळे प्रवाशांना एसटीची सद्य:स्थिती समजेल. तसेच एखाद्या एसटी मार्गावर जे थांबे नाहीत, तेदेखील दाखविले जातील.      – रणजितसिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button