breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सातारा जिल्ह्यातील कुख्यात वाळू तस्कर सोमनाथ चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक

पिंपरी । प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील कुख्यात वाळू तस्कर सोमनाथ उर्फ सोमाभाई चव्हाण याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तर अन्य एकाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.

युनिट चारने जुलै २०२० मध्ये अवैध अग्निशस्त्रांचा व्यापार करणा-या मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी पोलिसांनी १९ लाख ८९ हजार ५०० रुपये किमतीच्या ४२ पिस्टल, गावठी कट्टे आणि ६४ काडतुसे जप्त केली होती. १५ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर आणखी काही जणांची नावे निष्पन्न झाली होती. नावे निष्पन्न झालेल्या आरोपींना अटक करून कारवाई करण्याचे पोलिसांचे सत्र सुरु होते. दरम्यान, युनिट चारच्या पथकातील सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आणि हा तपास बारगळला. सर्व पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करण्यात आला.

संतोष चंदू राठोड (वय २३, रा. तळेगाव दाभाडे) याचे नाव पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. आरोपी संतोष याच्यावर २०१८ साली लोणावळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये त्याला अटक झाली होती. मागील काही दिवसांपूर्वी आरोपी संतोष त्या गुन्ह्यात येरवडा कारागृहातून बाहेर आला होता. पोलिसांना याची माहिती मिळाली, पोलिसांनी संतोषला १० ऑगस्ट रोजी चिंचवड परिसरातून अटक केली आणि त्याच्याकडे चौकशी करत एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

याच प्रकरणात सातारा जिल्ह्यातील कुख्यात वाळू तस्कर सोमनाथ उर्फ सोमाभाई रमेश चव्हाण (वय ३०, रा. कालगाव, ता. कराड, जि. सातारा) याचेही नाव निष्पन्न झाले होते. त्याला उंब्रज पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याप्रकरणी तसेच शासकीय सेवकाला काम करण्यास अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली होती. सोमनाथ सातारा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला १७ ऑगस्ट रोजी कारागृहातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करत पोलिसांनी चार गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

आरोपी सोमनाथ हा कुख्यात वाळू तस्कर आहे. त्याची सातारा परिसरात ‘शूट ग्रुप’ नावाची गुन्हेगारी टोळी आणि ‘आई साहेब प्रतिष्ठान’ नावाची संघटना आहे. त्याची सातारा, सांगली, कोल्हापूर आणि ठाणे या जिल्ह्यात दहशत आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत. २०१६ साली निगडी परिसरात कुख्यात गुंड कृष्णा डांगे उर्फ केडी भाई याच्या खून प्रकरणात सोमनाथ चव्हाण मुख्य आरोपी होता. तसेच सन २०१८ साली भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्षावर झालेल्या खुनी हल्ल्यातील सोमनाथ हा मुख्य सूत्रधार होता. गुन्हे शाखा युनिट चारने आजवर या प्रकरणात ४७ गावठी पिस्टल आणि ६८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले. तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविद चव्हाण, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button