breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सांताक्रूझमधून १ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, चौघांना अटक

मुंबईतील सांताक्रूझ भागातील वाकोला परिसरातून अंमलीपदार्थ विरोधी शाखेच्या पोलिसांनी एका कारमधून १०० किलो फेंटानिल ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ३१ डिसेंबरला अवघे तीन दिवस उरलेले असताना मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

या १०० किलो ड्रग्जची किंमती जवळपास १ हजार कोटीच्या घरात आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. एका कारमध्ये पोलिसांना हा साठा सापडला. चार बॅगमध्ये प्रत्येकी २५ किलो फेंटानिल ड्रग भरण्यात आले होते.

सलीम धाला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी आणि घनशाम सरोज अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सलीम धालाला याआधी सुद्धा गांजा बाळगल्या प्रकरणी २०१३ मध्ये अटक झाली होती.

फेंटानिल ड्रग्जचा कर्करोगाच्या उपचारामध्ये वापर केला जातो. बाहेर विक्री करण्यासाठी काही प्रयोगशाळांमध्ये गुप्त पद्धतीने फेंटानिल ड्रग तयार केले जाते. हेरॉईन, कोकेनमध्ये मिसळून किंवा पर्याय म्हणून फेंटानिलचे सेवन केले जाते. अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर फेंटानिल ड्रग्जचे सेवन केले जाते. फेंटानिलच्या ओव्हरडोसमुळे दरवर्षी अमेरिकेत हजारो मृत्यूंची नोंद होते.

अंमलीपदार्थ विरोधी शाखेच्या आझाद मैदान युनिटने ड्रग्ज जप्तीची ही कारवाई केली. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही वाकोला सुभाषनगर येथे सापळा रचून कारवाई केली अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

सलीम धाला कॉटन ग्रीन येथे वाहन चालक म्हणून काम करतो. संदीप तिवारी पदवीधर असून एका खासगी कंपनीत तो कामाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली व त्यांची नवी कोरी टाटा नेक्सन एसयूव्ही कार जप्त केली. या गाडीमध्येच हा साठा सापडला. चंद्रमणी तिवारीचे कांदिवली ठाकूर व्हिलेज येथे मोबाइलचे दुकान आहे. पोलिसांनी संदीप तिवारीची सुझूकी सुद्धा जप्त केली.

एनडीपीएस कायद्याखाली चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्जचे नमुने चाचणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. चारही आरोपी चौकशीत सहकार्य करत नसून हे ड्रग्ज त्यांना कोणाकडून मिळाले हे सांगायला तयार नाहीत अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी हे ड्रग काही परदेशी नागरिकांना देणार होते. ते हे ड्रग घेऊन अमेरिका आणि अन्य देशांमध्ये जाणार होते. कोकेन, हेरॉईन इतके हे महागडे ड्रग आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button