breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील यांनी स्वाभिमानीकडून निवडणूक लढवावी

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दिला प्रस्ताव

सांगली – उमेदवारीवरुन विश्‍वासात घेतले नसल्याचा आरोप करुन सवतासुभा मांडलेल्या विशाल पाटील यांना सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवावी, असा प्रस्ताव संघटनेने मंगळवारी दिला.

आमदार सतेज पाटील, कर्नाटकचे आमदार गणेश हुक्किरे यांनीही खासदार शेट्टी यांच्याशी चर्चा करुन तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. शेट्टी यांच्या निवासस्थानी शेट्टींसह, आमदार सतेज पाटील, आमदार गणेश हुक्किरे, गुलाबराव घोरपडे, विठ्ठल सरनोबत उपस्थित होते. शिरोळ आणि जयसिंगपूरमध्ये तीन ठिकाणी याप्रश्‍नी गुप्त बैठका झाल्या.

सांगलीच्या जागेवरुन सांगलीसह जयसिंगपूर व शिरोळमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून  कॉंग्रेसच्या नेत्यांच्या जयसिंगपूर फेऱ्या वाढल्या आहेत. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, भारती विद्यापीठाचे अध्यक्ष, आमदार विश्‍वजीत कदम यांच्यासह नेत्यांनी खासदार शेट्टी यांची भेट घेऊन तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशाल पाटील यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात शड्डू मारण्याची तयारी केली आहे. यामुळे कॉंग्रेस आणि स्वाभिमानीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

कॉंग्रेस श्रेष्ठींनी तातडीने तिढा सोडवावा अन्यथा स्वबळाची भाषा स्वाभिमानीने केल्याने आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी सकाळी खासदार शेट्टींच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली. स्व. वसंतदादा पाटील यांनी कॉंग्रेसला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. त्यामुळे तुम्ही कॉंग्रेसपासून बाजूला जाऊ नये. अपक्ष म्हणून लढू नये असा सल्ला सतेज पाटील यांनी विशाल पाटील यांना दिल्याचे सांगितले. पण विशाल पाटील ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

स्वाभिमानीकडून लढण्याच्या प्रस्तावावर कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्याचे सांगत निर्णयावर ठोस निर्णय दिला नाही. दरम्यान, मंगळवारीही याप्रश्‍नी केवळ चर्चेचे गुऱ्हाळ रंगले. विशाल पाटील यांची मनधरणी करण्यासाठी कॉंग्रेस नेते सरसावले असून श्री पाटील मात्र ऐकण्यापलिकडे गेल्याने त्यांची भूमिकाच निवडणूकीची दिशा स्पष्ट करेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button