breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ताधा-यांचा मेट्रो उद्घाटनाचा डाव हाणून पाडणार – सचिन चिखले

  • आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनाचा घाट
  • निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पासाठी मनसेची वाट्टेल ते करण्याची तयारी

पिंपरी / महाईन्यूज

दोन दिवसांपूर्वी पुणे महामेट्रोची पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरी चाचणी घेण्यात आली. परंतु, निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाच्या कामकाजावर मेट्रो प्रशासनाची भूमिका सुस्पष्ट नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी श्रेय लाटण्यासाठी मेट्रोच्या उद्घाटनाचा डाव आखत आहेत. अर्धवट मेट्रोचे काम करून पिंपरी-चिंचवडकरांची फसवणूक करणा-या मेट्रो प्रशासनाचा आणि सत्ताधा-यांचा डाव हाणून पाडण्याचे आव्हान मनसेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी दिले आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो पिलरचे काम चालू आहे. याच मार्गावर दोन दिवसांपूर्वी मेट्रोची ट्रायल घेण्यात आली. वास्तविक पाहता फुगेवाडीच्या पुढे मेट्रोचा एकही पिलर उभा केलेला नाही. त्याचबरोबर निगडीपर्यंत मेट्रोची मागणी आमची असताना त्याकडे मेट्रो प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आम्हाला केवळ आश्वासनांवर झुलवत ठेवून ट्रायल घेतली जाते. प्रत्यक्षात निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गावर अद्याप कोणतेही काम सुरू नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे, असे चिखले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

मेट्रो पिंपरी ते फुगेवाडी मार्गावरच धावणार का ?

निगडीपर्यंत मेट्रो जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत मेट्रोचे उद्घाटन होऊ देणार नाही. सत्ताधारी आणि मेट्रो प्रशासनाची ही ट्रायल केवळ दिखाऊ आहे. आगामी महापालिका निवडणुकीत याचे श्रेय लाटण्यासाठीचा हा डाव आहे. फुगेवाडीच्या पुढे आणि मुंबईच्या दिशेने पिंपरीच्या पुढे मेट्रोचे शून्य काम आहे. असे असेल तर मेट्रो केवळ पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावरच धावणार का ?, असा सवाल चिखले यांनी उपस्थित केला आहे. पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोचे गाजर दाखवून सत्ताधारी आणि मेट्रो प्रशासनाने आजपर्यंत झुलवत ठेवले आहे. निगडीपर्यंत मेट्रो जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मेट्रोचे उद्घाटन होऊ देणार नाही, असे आव्हान चिखले यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button